चोरट्यांच्या २४ तासांत आवळल्या मुसक्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:28+5:302021-04-02T04:40:28+5:30
सणबूर : ढेबेवाडी-नवारस्ता मार्गावर डोंगरमाथ्यावर शिद्रुकवाडीनजीक एका महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या २४ तासांच्या आत सहायक पोलीस निरीक्षक संतोष ...

चोरट्यांच्या २४ तासांत आवळल्या मुसक्या!
सणबूर : ढेबेवाडी-नवारस्ता मार्गावर डोंगरमाथ्यावर शिद्रुकवाडीनजीक एका महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या २४ तासांच्या आत सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभागातील फोफावलेली गुन्हेगारी व ढेबेवाडी पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा उजळण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
ढेबेवाडी विभागातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र काढण्यापासून पश्चिमेला शिराळा हद्दीपर्यंत पसरले आहे. जंगल आणि दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या या विभागातील लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरीकरिता मुंबई व पुणे शहराकडे स्थंलातर करीत आहेत. विभागात वांग-मराठवाडी धरणग्रस्तांची आंदोलने तर पवनचक्की कंपन्यांच्या दलालांची व गुंडांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत माजवलेली दहशत व गटातटाचे राजकारण यामुळे हा विभाग कायमच चर्चेत राहिला आहे.
ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हा परिसर वेगवेगळ्या घडत असलेल्या गुन्ह्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून दहशतीखाली आला होता. सडकसख्ख्याहरीपासून गल्लीतील दादांची दहशत विभागात पाय पसरू लागली होती. दोन वर्षांपूर्वी करपेवाडी येथील शाळकरी मुलीचा गळा चिरून खून झाला होता. मात्र, तिचे मारेकरी पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते. तर गेल्यावर्षी चोरट्यांनी ढेबेवाडी बाजारपेठेतील दुकाने लक्ष्य केली होती. एकाच रात्रीत सात ते आठ दुकाने फोडून लाखोंचा माल लंपास केला होता. परंतु, त्या चोरट्यांना पकडण्यात ढेबेवाडी पोलिसांना यश आले नव्हते. त्या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी परिसर हादरला होता. लाॅकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी नाहक त्रास दिल्याचा आरोपही ग्रामस्थ करत होते. तर लाॅकडाऊन असतानादेखील सांगली व शिराळा येथून ढेबेवाडी विभागात दारूचा महापूर येत होता. त्यावेळी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकच्या मर्जीतील झीरो नंबर पोलिसाने विभागात उन्माद माजविला होता. त्या झीरो नंबर पोलिसाच्या पराक्रमाने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे गुन्हेगारांना लगाम घालण्याऐवजी आर्थिक तडजोडीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली होती. नव्याने रुजू झालेले ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी बोकाळलेली विषवल्ली मुळापासून उखडून टाकण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.
संतोष पवार यांनी ढेबेवाडीचा चार्ज घेताच विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान यशस्वीरीत्या त्यांनी पार पाडले. विभागात अवैधरित्या येणारी दारू आणि दारू धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले.
(चौकट)
२४ तासांत आरोपींना ताब्यात...
दोन दिवसांपूर्वी नवारस्ता ढेबेवाडी घाटात महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या तिच्या नात्यातील कारचालकासह त्याच्या मित्राला २४ तासांच्या आत पकडून गजाआड केले व सुमारे दीड लाख किमतीचे सोन्याचे दागिने महिलेस पुन्हा मिळवून देण्यात सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्यासह ढेबेवाडी पोलिसांनी केलेली कामगिरी ढेबेवाडी विभागातील लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे.