कोऱ्या नंबरप्लेटवरून सापडला चोर
By Admin | Updated: May 17, 2015 01:27 IST2015-05-17T01:27:24+5:302015-05-17T01:27:24+5:30
१३ दुचाकी जप्त : साताऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कोऱ्या नंबरप्लेटवरून सापडला चोर
सातारा : कोऱ्या नंबरप्लेटच्या गाडीवरून एक युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्यावेळी तो अट्टल चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीनंतर त्याने सांगली, सातारा, कोल्हापूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सयाजी सुदाम थोरात (वय ३०, रा. मायणी, ता. खटाव) असे अटक झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री सयाजी थोरात हा कोऱ्या नंबरप्लेटची दुचाकी घेऊन गोडोलीतून निघाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला तेथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. सांगली, सातारा, कोल्हापूरसह दहिवडी, मिरज या भागातही त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरी केल्यानंतर तो मित्रांना त्या दुचाकी विकत होता. यापूर्वीही त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल झाले असल्याने पोलिसांनी तपास त्याच्यावर केंद्रित केला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी विकलेल्या १३ दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व दुचाकींची किंमत ४ लाख ३० हजार इतकी आहे. थोरातला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार विलास नागे, बाळासाहेब वायदंडे, संजय शिंदे, आनंदराव भोईटे, मोहन नाचण, प्रवीण शिंदे, शरद बेबले, युनूस मुलाणी, संतोष जाधव, प्रवीण कडव, नितीन भोसले, योगेश पोळ, विक्रम पिसाळ, रूपशे कारंडे, मारुती अडागळे, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
जवळच्या नातलगाचा हात !
सयाजी थोरात हा गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत आहे. चोरीच्या गुन्ह्यात अनेकदा त्याला अटकही झाली आहे. कारागृहातून सोडवून आणण्यासाठी त्याला जवळचेच मदत करीत आहेत.
कारागृहातून सुटल्यानंतर सयाजी पुन्हा अशाच उचापत्या करीत असे. चोरीसाठी त्याच्या मदतीला अत्यंत जवळचा एक नातलग असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. चोरून दुचाकी आणल्यानंतर सयाजी त्या दुचाकी केवळ पाच-सहा हजारांमध्ये विकत होता.