वाई : सोनजाई डोंगरावरील काळूबाई, पद्मावती मंदिरात परप्रांतीय चोरट्याने दानपेटी फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करत असतानाच सतर्क नागरिकांनी वेळीच लक्ष देऊन चोरट्यास पाठलाग करून पकडले. ही घटना सोमवार, दि. ५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनजाई देवस्थानच्या परिसरात असणाऱ्या काळूबाई पद्मावती मंदिरातील दानपेटीचे कुलूप उघडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा करत असताना ओम प्रकाश संतोष कश्यप (वय १९, रा. नवागाव, ता. कवरजा, जिल्हा नदीधाम, छत्तीसगड) याला पाठलाग करून पकडले. त्याला वाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून रोख रक्कम ४ हजार ५७५ हस्तगत केली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यास रंगेहात पकडण्यात यश आल्याने पोलिसांकडून नागरिकांचे काैतुक करण्यात आले. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आर. झेड. कोळी करीत आहेत.