कोरेगाव येथे चक्क गुलाबी मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:32 IST2019-04-23T23:32:46+5:302019-04-23T23:32:51+5:30
कोरेगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देत गुलाबी मतदान केंद्रांची निर्मिती करून अभिनव उपक्रम राबवला. सहायक निवडणूक ...

कोरेगाव येथे चक्क गुलाबी मतदान केंद्र
कोरेगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देत गुलाबी मतदान केंद्रांची निर्मिती करून अभिनव उपक्रम राबवला.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत कीर्ती नलावडे व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिणी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव शहरातील कांतिलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्र क्र. २३० मध्ये हे केंद्र होते. तेथील सर्वच प्रक्रिया महिलांनीच पार पाडल्या. या केंद्रावर ८७९ एकूण मतदान होते.
या मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहात तयारी केली होती. सर्वत्र गुलाबी पडदे लावून गुलाबी रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वार देखील आकर्षक बनविण्यात आले होते. तसेच भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. केंद्राध्यक्ष म्हणून सुजाता शेंडे यांनी काम पाहिले तर मतदान अधिकारी म्हणून राधा पाटील, अनुराधा भोसले, प्रिया बोबडे यांनी तर शिपाई म्हणून रोहिणी काळे यांनी कर्तव्य बजावले.
पोलीस बंदोबस्तासाठी देखील महिला कर्मचारीच तैनात करण्यात आल्या होत्या. संपूर्ण शहरात या केंद्राचीच चर्चा होती. शहरातील नागरिक विशेषत: महिलांनी हे केंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. तयार करण्यात आलेल्या पिंक केंद्र ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.