त्यांना जमतेय... मग यांना काय होतेय?
By Admin | Updated: August 6, 2015 20:40 IST2015-08-06T20:40:57+5:302015-08-06T20:40:57+5:30
साताऱ्यातील चित्र : व्यवसायाच्या नावाखाली हव्यात मोक्याच्या जागा

त्यांना जमतेय... मग यांना काय होतेय?
सातारा : ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे कारणे देऊन नगर पालिकेने नुकतेच राजवाडा परिसारतील फळ विक्रेत्यांसमोर लोटांगण घातले. आणि लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले फ्रूट मार्केट तसेच पडून राहिले. या उलट पालिका प्रशासनाचा आदेश मानून पंचायत समितीच्या आड रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून फळविक्रेते आणि अलीकडेच आलेले स्वेटर व्यावसायिक त्यांचा व्यवसाय करत आहे. ‘त्यांना जमतयं... तर यांना का जमत नाही?,’ असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
सातारा शहरात शिस्तीचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांविषयी चर्चा रंगते. गरिबांवर अन्याय नको, त्यांच्या व्यवसायावर परिणाम नको, ही भूमिका रास्त आहे. पण, प्रशस्त जागेत त्यांची सोय करूनही जर मुख्य रस्त्यावरच व्यवसाय होतो, हे म्हणणे पटत नाही.फळविक्रेते कुठेही बसले तरी त्यांच्याकडे ग्राहक येतो, हे सत्य कोणीच नाकारणार नाही. ग्राहक सेवेचा हा व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांची पाठ अशी फिरत नाही. भाजी आणि फळे एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक खूश असायला हवेत.
राजवाडा परिसरातील फळ विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील सप्ताहात याविषयी एक महत्त्वपूर्ण बैठक पालिका आणि फेरीवाला संघटनेत होणार आहे. या बैठकीनंतर त्यांना कोणती जागा द्यायची, हे स्पष्ट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राजवाडासमोर फळविक्रेते बसणार नाहीत. भविष्यात राजवाडा परिसर नो पार्किंग आणि नो हॉकर झोन होणार आहे. त्यामुळे येथे फळ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येणार आहे.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, नगर पालिका, सातारा
चार ठिकाणे... चार निर्णय!
शहराच्या विकासाआड आलेल्यांची गय करू नका, असे फर्मान सोडत लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणांविषयीची आपली भूमिका काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केली होती. त्यामुळे स्टॅण्ड परिसरातील रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे पंचायत समितीच्या बोळात फळ आणि स्वेटर विक्रेत्यांना जागा देऊन प्रशासनाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.
एवढेच काय जिल्हा परिषद परिसरात असलेल्या चायनिज व्यावसायिकांना तंबी देऊन सरळ करण्यात आले; पण राजवाडा फळ विक्रेत्यांजवळ आलं की, विकासाचं घोडं आडलं! ते का आडलं? याचे उत्तर एकच लोकप्रतिनिधीमुळे! शहराच्या तीन टोकांवर विकासाचा डंका पिटून स्थिर झालेल्या व्यावसायिकांना त्यांचा उद्योग हलवण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना राजवाडा व्यावसायिकांचे असे कोणते दु:ख दिसले की, त्यांना शहराच्या विकासापेक्षाही त्यांच्या व्यवसायाचा कळवळा आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.