गुरं खात नाहीत, ते खातात माणसं!
By Admin | Updated: December 26, 2014 23:54 IST2014-12-26T22:07:48+5:302014-12-26T23:54:23+5:30
रेशनिंगचा गहू : दगड, माती, काड्यांचा गोरगरिबांना ‘पौष्टिक’ आहार

गुरं खात नाहीत, ते खातात माणसं!
सागर गुजर - सातारा -हाडाचा शेतकरी घासातला घास गुरांना देतो. चुकून अयोग्य वस्तू गुरांच्या खाण्यात येऊ नये, याचीही काळजी घेतो; पण आपलं शासन जिवंत माणसांच्या आरोग्याबाबतही उदासीन आहे. गुरेही खात नाहीत असे खडे, मातीमिश्रित गहू रेशनिंगच्या माध्यमातून घराघरांत पोहोचत आहेत.
‘पापी पेट का सवाल है भैय्या,’ म्हणत पोटाची खळगी भरण्यासाठी सामान्य कुटुंबे नाइलाजानं खडे बाजूला करुन गहू दळणाला पाठवत आहे. याच ‘पौष्टिक’ अन्नावर पोसलेले देह काबाडकष्ट करतात, म्हणून त्यांची अशी हेळसांड केली जातेय का, असा सवाल सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (शासनाच्या भाषेत प्राधान्य कुटुंबे) दोन रुपये ८0 पैसे प्रतिकिलो दराने महिन्याकाठी ३५ किलो गहू मिळतो. बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी दरात मिळत असल्याने गोरगरीब लोक तोच खरेदी करतात. हा गहू किडका नसला तरी त्यात माती, काड्या, खडेमिश्रित माती, लाकडी काड्या यांचा भरणा आहे. सदर बझार येथील प्राधान्य कुटुंबे सध्या हा गहू स्वच्छ करण्यात गुंतलेली पाहायला मिळतात. हा प्रश्न एकाच ठिकाणचा नसून जिल्ह्यातील नागरिकांना रेशनिंगमधून मिळणाऱ्या धान्याचा हा सार्वत्रिक अनुभव आहे.
दरम्यान, याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, ‘वखार महामंडळातील धान्याची तपासणी करुन मगच ते स्वस्त धान्य दुकानदारांकडे पाठविले जाते. त्यातूनही दुकानदारांनी काही आक्षेप घेतल्यास तो गहू शासनाकडे परत केला जातो,’ असं सांगण्यात येतंय. त्यामुळे नेमकं ‘पाणी कुठे मुरतंय’ हे समजेनासं झालंय. दुकानदाराकडे जर अस्वच्छ गहू आला तर तोच कार्डधारकांच्या माथी मारला जातोय, हे स्पष्ट होत आहे. अथवा काही जण त्यात दगड, माती टाकून ‘वजन’ वाढवतात, असंही म्हणायला वाव आहे. पुरवठा विभागाने यात लक्ष घालावे, तसेच छापासत्र राबवून गव्हात खडे मिसळून गरिबांच्या आरोग्यावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
जिल्ह्यातील रेशनिंगचा लेखाजोखा
रेशनिंग
परवानाधारक :
केरोसीन
परवानाधारक :
शिधापत्रिकाधारक :
प्राधान्य कुटुंबे :
रेशनिंगवर धान्य पाठविण्याआधी त्याची तपासणी केली जाते. रेशनिंग दुकानातील निकृष्ट धान्याविषयी तक्रार असल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल.
- शमा ढोक (पवार)
जिल्हा पुरवठा अधिकारी
महिन्याकाठी होणारा धान्यपुरवठा
गहू
5हजार 660 मेट्रिक टन
तांदूळ
3हजार 900 मेट्रिक टन