पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला !

By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:24:45+5:302016-03-16T08:29:49+5:30

कऱ्हाड तालुक्यातील स्थिती: ‘मनरेगा’च्या दीडशे विहिरींना वीजजोडणीची प्रतीक्षा; पाणी असूनही करपताहेत पिके, हेलपाट्याने शेतकरी हतबल

There is water; But I could not pay! | पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला !

पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला !

कऱ्हाड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कऱ्हाड तालुक्यात सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षांत ४३३ विहिरी खोदण्यात आल्या. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, त्यापैकी १४७ विहिरींना अद्यापही वीजजोडणीची प्रतीक्षा आहे. यंदा दुष्काळाची तीव्रता भयानक आहे. अशाच स्थितीत विहिरीत पाणी असूनही उपसा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. तर वीज जोडणीसाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालून शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहेत.
भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी लागणारे वीज कनेक्शन तातडीने देण्याची घोषणा नेहमीच होते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुभव मात्र वेगळेच येताना दिसतात. सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) ची चर्चा सगळ्याच पातळीवर जोरदार सुरू आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे सरकार सांगते. मात्र, प्रत्यक्षात नुसते डबरे काढून उपयोग नाही. तर पाणी उपसासाठी वीज कनेक्शनही लागते हे कोण लक्षात घेणार ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून विचारला जाऊ लागला आहे.
कऱ्हाड तालुक्यात गेल्या दोन वर्षांत ४३३ विहिरींची खुदाई करण्यात आली. त्या सर्व विहिरींना शासनाचे पूर्ण अनुदानही देण्यात आले आहे. विहिरींची खुदाई, बांधकाम असे सर्व काम पूर्ण झाले असून, त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठीची यादी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे सादर करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनीही त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक रक्कमही वीजवितरण कंपनीकडे भरली आहे. पैकी २८६ विहिरींना वीज कनेक्शन मिळाले. मात्र, १४७ विहिरींना अद्याप वीजवितरण कंपनीने वीज कनेक्शनच दिलेले नाही.
दरम्यान, वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीला पंचायत समितीमध्ये हेलपाटे घालायला सुरुवात केले. तेथून त्यांना, ‘आम्ही विद्युत महामंडळाकडे वीज कनेक्शन द्या, असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडेच चौकशी करा.’ असे उत्तर मिळते. मात्र, वीजवितरण कार्यालयात गेल्यानंतर तेथे त्यांची कोणी दखल घेतली जात नाही. उलट उडावाउडवीचीच उत्तरे मिळतात. त्यामुळे या कार्यालयामध्ये वीज कनेक्शसाठी हेलपाटे घालून शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
यंदा कृष्णा-कोयनेच्या काठावर वसलेल्या कऱ्हाड तालुक्यालाही उन्हाळाची चांगलीच झळ बसू लागली आहे. तालुक्यातील ५९ गावांत पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नदी, ओढ्याकाठच्या विहिरींना थोडेसे पाणी असले तरी इतरत्र असलेल्या विहिरींनी तळ गाठला आहे. पिके कशी जगवायची याची शेतकऱ्यांना चिंता पडली आहे. याउलट तालुक्यातील १४७ विहिरींना वीज कनेक्शन नसल्याने गेल्या दीड वर्षापासून त्यातील पाणीसाठी वापराविना पडून आहे. त्यामुळे ‘पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
याबाबत संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांचे पर्यायाने कृषीप्रधान राष्ट्राचे होणारे नुकसान रोखावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी)


पत्रव्यवहाराची जुगलबंदी
दरम्यान, वीज कनेक्शनसाठी शेतकरांचा रेटा वाढल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून वीज कनेक्शनची मागणी केली. मात्र, त्याला, ‘मनरेगा’ अंतर्गत असलेल्या विहिरींना वीज कनेक्शन देण्यासाठी लागणाऱ्या वेगळ्या निधीची तरतूद उपलब्ध नाही. आपण जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून हा निधी महावितरणकडे वर्ग करण्याकरिता पत्र व्यवहार करावा, असे शासकीय उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. या पत्रव्यवहाराच्या जुगलबंदीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल मात्र सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रभागी असते. कऱ्हाड तालुक्यातील ‘मनरेगा’ अंतर्गत वीज कनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. त्यांना बरोबर घेऊन वीज कनेक्शनसाठी लवकरच वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. त्यातून मार्ग न निघाल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
- सचिन नलवडे
तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी
संघटना,कऱ्हाड उत्तर

Web Title: There is water; But I could not pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.