आली अंबेची सवारी; नंदादीप घरोघरी!

By Admin | Updated: October 13, 2015 23:52 IST2015-10-13T21:57:18+5:302015-10-13T23:52:34+5:30

उत्सव नवदुर्गेचा : ढोल-ताशांचा गजरात मिरवणुका काढून दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना; नऊ दिवस विविध कार्यक्रमांची धूम

There was Ambee ride; Nandadeep house! | आली अंबेची सवारी; नंदादीप घरोघरी!

आली अंबेची सवारी; नंदादीप घरोघरी!

सातारा : पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून मंगळवारी सातारा जिल्ह्यात दुर्गादेवीचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले अन् घटस्थापना करून सर्वत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. देवी आणि शक्तीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अवघी सातारानगरी सज्ज झाली आहे. आदिशक्तीच्या आगमनाने जिल्हाभर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राजपथावरून भव्य मिरवणूक काढून शहरातील सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली.
नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय उत्सवासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मंडळांनी केले आहे. शहरातील चौका-चौकात ‘उदे गं अंबे उदे’चा जागर सुरू झाला आहे. भव्य आणि सुबक अशा दुर्गामूर्तींची मिरवणूक पाहण्यासाठी सातरकरांनी राजपथावर गर्दी केली होती. हा उत्सव नऊ दिवस सातारकरांसाठी दांडियाचा नृत्याविष्कार पाहण्याची जणू पर्वणीच घेऊन आला आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यात १६६४ मंडळे---जिल्ह्यात १६६४ नोंदणीकृत सार्वजनिक मंडळे आहेत. तर सातारा शहरातील मंडळांची संख्या ६४ आहे. सुरुवातील साताऱ्यात मोती चौक, सिटी पोस्टाजवळ आणि सदर बझार अशा तीन ठिकाणी दुर्गोत्सव साजरा व्हायचा. गेल्या दहा वर्षांपासून ती संख्या वाढत जाऊन ६४ वर पोहोचली आहे.

मांढरगडावर ‘चांगभलं’चा गजर---लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळुबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. काळुबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात मंगळवारी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी भाविक उपस्थित होते. मांढरदेव येथे सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. देवीची विधीवत पूजा करण्यात आली. मंदिरासमोर मंडप उभारला असून आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

खंडाळ्यात कडाडली हलगी...
ढोल-ताशांचा गजर, हलगीचा कडकडाट आणि संबळाच्या तालावर खंडाळ्यात दुर्गामातेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शाही मिरवणुकीने दुर्गादेवीचे आगमन झाले. गजराज मित्र मंडळाने काढलेल्या मिरवणुकीत युवकांनी मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. तर वाघ्या-मुरळीच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुर्गा स्थापनेसाठी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शामराव गाढवे, आप्पासाहेब वळकुंदे, जावेद पठाण, संपतराव खंडागळे, भरत गाढवे, तसेच युवक, महिला उपस्थित होत्या.

Web Title: There was Ambee ride; Nandadeep house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.