पारदर्शकता आहे...विद्यार्थ्यांनी पाऊल पुढे टाकावेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:53 IST2016-03-18T22:17:14+5:302016-03-18T23:53:40+5:30

राजेश चव्हाण : कोल्हापूर कृषी महाविद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठानं घडवलं; एम.एस्सी. अ‍ॅग्रीनंतर तहसीलदारपदाला गवसणी

There is transparency ... students should step forward! | पारदर्शकता आहे...विद्यार्थ्यांनी पाऊल पुढे टाकावेच!

पारदर्शकता आहे...विद्यार्थ्यांनी पाऊल पुढे टाकावेच!

सागर गुजर -- सातारा --स्पर्धा परीक्षेसाठी जीव तोडून मेहनत घेणाऱ्यांना प्रशासनात हमखास संधी आहे. या परीक्षेत पारदर्शकताही तितकीच आहे. अभ्यासातील सातत्य आणि परिश्रमावरील विश्वास या दोन गोष्टी प्रशासनात येऊ पाहणाऱ्या जिगरबाज तरुणांना रोखू शकत नाहीत, असं अनुभवसिद्ध सूत्र साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितलं.
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी हे मूळगाव असणाऱ्या राजेश चव्हाण यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व निरीक्षणाच्या जोरावर तहसीलदारपद मिळविले आहे. या यशामध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय आणि राहुरी कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगत होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांनाही बालपणी विटी-दांडू, गोट्या असे खेळ खेळण्याची आवड होती. विहिरी, कॅनॉलमध्ये पोहायचे, घरच्या शेतात गरज असेल तेव्हा राबायचे, असेच त्यांचे बालपण व शालेय जीवनातील प्रसंग होते. त्यांचे वडील मोतीराम चव्हाण हे डोरलेवाडीतील पहिलेच पदवीधर! वडील पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये माध्यमिक शिक्षक असल्याने राजेश चव्हाण यांचे शिक्षण पुणे, बारामती येथील विविध विद्यालयांमध्ये झाले.
पहिली ते सहावीपर्यंत ते वाणेवाडी या गावात शिकले. सातवी ते आठवीपर्यंत इंदापूर तालुक्यातील कळस येथे त्यांचे शिक्षण झाले. वडील ज्या ठिकाणी बदलून जात, त्या गावातील शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागत होता.
शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने वडिलांनी त्यांना वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात प्रवेश घ्यायला लावला. परिसरातील चांगल्या दर्जाची शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक होता. नववी व दहावी ही दोन वर्षे या शाळेतच काढली. दहावीला ८७ टक्के गुण मिळाले. बारावीची परीक्षा त्यांनी बारामतीमधील तुळजाराम चतूरचंद सायन्स कॉलेजमधून केली. यानंतर वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी असे दोनच पर्याय सायन्सची मुले निवडत असत; मात्र राजेश चव्हाण यांनी बी.एसस्सी. अ‍ॅग्री करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात मन लावून त्यांनी बी.एसस्सी. पूर्ण केली. एम.एसस्सी. अ‍ॅग्रीसाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला.
राहुरी कृषी विद्यापीठात आल्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. आयुष्यातील ध्येय निश्चित झाली. मुलाखतीचे तंत्र, गु्रप डिस्कशन, प्रश्नपत्रिकांचा सराव असं रोजचं काम सुरू होतं. पहाटे पाच वाजता उठायचे. रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचा, असा नित्यनेम सुरू झाला. २००० मध्ये ते एम.एसस्सी. अ‍ॅग्री झाले. दोन वर्षे त्यांनी मन लावून एमपीएससीचा अभ्यास केला. २००१ मध्ये त्यांनी नायब तहसीलदार पदाची परीक्षा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांक उत्तीर्ण केली. सांगली, वाई, वडगाव मावळ या ठिकाणी प्रशासकीय सेवा बजावल्यानंतर ते साताऱ्यात तहसीलदार म्हणून रुजू
झाले.
आपण स्वत: कृषी पदवीधर असल्याने शेती करणाऱ्यांविषयी आत्मीयता कायम राहिली आहे. राजस्व अभियानाच्या माध्यमातून काम करत असताना खूप आनंद होतो. पाणंद रस्ते, शेतामध्ये जोडणारे रस्ते तयार करत असताना रस्त्यांची किती गरज आहे, हे लक्षात आले. शेती संदर्भातील कामे करत असताना फार समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. कृषी पदवी घेतल्याचे सार्थक या निमित्तानं झालं आहे. पत्नी शीतल या दिव्या व मुग्धा या दोन मुलींची विशेष काळजी घेतात. प्रशासकीय कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडं त्याच लक्ष देतात.

संयम ठेवा, यश तुमचेच!
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना संयम महत्त्वाचा असतो. जे ध्येय मनात बाळगले आहे, त्या ध्येयाच्या दिशेने जाताना आळस, थकवा, कौटुंबिक परिस्थिती, वाढते वय या बाबी त्रासदायक ठरतात; मात्र अभ्यासावर लक्ष ठेवून वाटचाल केल्यास शंभर टक्के यश मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांनी काही झाले तरी ध्येयाची दिशा बदलता कामा नये, असे राजेश चव्हाण सांगतात.
ग्रुप डिस्कशनमुळे सर्व सोपे
राहुरी येथील कृषी एकता मंचचे मुलांच्या एमपीएससी परीक्षेतील यशामध्ये मोठा वाटा आहे. या मंचने प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिला आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच मुलाखतीसाठी लागणारे तंत्र आम्हाला शिकविले. मुलाखतीला सामोरे जाताना मनात थोडी चलबिचल राहणे साहजिक असले तरी गु्रप डिस्कशनच्या प्रभावी माध्यमामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: There is transparency ... students should step forward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.