बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्य पक्ष्यांची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST2021-01-13T05:42:05+5:302021-01-13T05:42:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : परदेशातून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांमुळे भारतात बर्ड फ्लूचा प्रसार होत आहे. या परदेशी पाहुण्यांमुळे ...

There is no record of wild birds dying due to bird flu | बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्य पक्ष्यांची नोंदच नाही

बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्य पक्ष्यांची नोंदच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : परदेशातून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांमुळे भारतात बर्ड फ्लूचा प्रसार होत आहे. या परदेशी पाहुण्यांमुळे वन क्षेत्रात मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची नोंद ठेवण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाही. परिणामी बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्या वन्य पक्ष्यांचा आकडा अज्ञातच राहत आहे.

भारतात सध्या हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा चांगलाच फटका पोल्ट्री मालकांना बसला आहे. महाराष्ट्रात परभणीनंतर ठाण्यातही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परदेशी पक्ष्यांमुळे येणारा हा आजार स्थानिक पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत आहे. नैसर्गिकरीत्या संकटांवर मात करण्याची क्षमता बर्ड फ्लूच्याबाबत पक्ष्यांमध्ये दिसत नाही. परिणामी स्थानिक पक्षीही स्थलांतराचा मार्ग स्वीकारतात आणि अन्य ठिकाणीही याचा प्रादुर्भाव वाढत जाते.

थव्याने राहणारे आणि त्यातही पानपक्षी यात मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतराचा पॅटर्न शासकीय यंत्रणांना ज्ञात आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणाहून कोणते पक्षी येऊन प्रादुर्भाव होऊ शकतो याचा ठोकताळा यंत्रणांकडे आहे. या आधारे पक्ष्यांवर लक्ष ठेवून त्यांचा अभ्यास केला तर हा फ्लू कुठपर्यंत पोहोचलाय याची माहिती उपलब्ध होऊ शकेल.

चौकट :

१. परदेशातून हे पक्षी येतात भारतात!

समुद्री गल पक्षी : दक्षिण रशिया पूर्व मंगोलिया

बार हेडेड गूज (राजहंस) : युरोप

अग्निपंख/ रोहीत/ फ्लेमिंगो : दक्षिण आणि आग्नेय आशिया, युरोप, आफ्रिका

सायबेरियन क्रेन : ध्रुवीय प्रदेशातून स्थलांतर

अमूर फाल्कन : आफ्रिका

धोबी : यरोप, आशिया

मार्श ह्यारियर : अमेरिका

नीळकंठ : युरोप आशिया

भोरड्या (रोजी स्टार्लिंग) : हिमालय प्रदेश

२. विहिणीचा हंगाम ठरू शकतो घातक

देश-विदेशातून येणारे पर्यटक राज्यभरात पक्षी निरीक्षण आणि त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी येत असतात. पक्ष्यांचा हा विणीचा हंगामही असतो. या दिवसांत घातलेल्या अंड्यातून येणाऱ्या पिलांवरही बर्ड फ्लूचा प्रार्दुभाव होण्याची भीती आहे. त्यामुळे पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पर्यटन करणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. नवजात पिलांनाही याचा प्रादुर्भाव झाला तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

कोट :

परदेशी स्थलांतरित पक्ष्यांकडून भारतात दाखल झालेला बर्ड फ्लू महाराष्ट्रातही पोहोचला आहे. परिसरात कुठंही मृत्युमुखी पडलेले पक्षी आढळून आले तर त्याची माहिती तातडीने पशुसंवर्धन विभागाला देणं आवश्यक आहे. यामुळे तातडीने शासकीय स्तरावर हालचाली होऊन याचा फैलाव रोखला जाईल.

- सुनील भोईटे, पर्यावरण अभ्यासक, सातारा

Web Title: There is no record of wild birds dying due to bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.