लोकइच्छेविरोधात शंभर फुटी रस्ता नाही
By Admin | Updated: December 26, 2014 23:45 IST2014-12-26T23:24:01+5:302014-12-26T23:45:20+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडकरांना संघर्ष करावा लागणार नाही

लोकइच्छेविरोधात शंभर फुटी रस्ता नाही
कऱ्हाड : ‘शहरातील मार्केट यार्ड ते दत्त चौक दरम्यानचा प्रस्तावित शंभर फुटी रस्ता लोकइच्छेविरोधात होणार नाही. पालिकेने त्याच्या विरोधात ठराव केला असेल, तर ते चांगलेच आहे; परंतु कऱ्हाडकरांना त्याबाबत संघर्ष करावा लागणार नाही. त्यांना अपेक्षित असेल तेवढाच रस्ता रुंदीकरण होईल,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना मंजूर केलेल्या कामात चाळीस टक्के कपात करण्याचा निर्णय आताच्या नव्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्याच्या वर्क आॅर्डर निघाल्या नाहीत, त्या कामांना अडचणी येऊ शकतात; पण कऱ्हाडसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न केला होता आणि कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहेच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासात्मक बोलतात. आंतरराष्ट्रीय दौरे करतात. ही बाब चांगलीच आहे; पण त्यांचेच सहकारी धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करतात, हे देशाला परवडणारे आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंदुत्ववाद हेच भाजपचे मूळ तत्त्वज्ञान असल्याने मुस्लीम आरक्षण मंजूर झालेले नाही,’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणीच मुळात चुकीची आहे. उत्साहाच्या भरात फडणवीसांनी ती केली खरी; पण त्याला मोंदींची मान्यता असल्याचा संदेश त्यातून गेला. मात्र, पंतप्रधानांची त्याला मान्यता नसल्याने तो विषय आता संपला आहे. परंतु मुंबईला स्वतंत्र दर्जा देण्याबाबतच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या की काय, अशी भीती मात्र निर्माण झाली आहे, असेही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अशी फाईल माझ्याकडे आलीच नव्हती !
अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी नवे सरकार तरी करणार का? याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, ‘हा त्यांचा निर्णय आहे; पण त्याबाबतची कोणतीही फाईल मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आली नव्हती,’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
उत्तरे द्यायला पाच वर्षे वेळ
निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरही स्थानिक विरोधक तुमच्यावर टीका व आरोप करीत सुटले आहेत, त्याला उत्तरे कधी देणार? असे छेडले असता, ‘घाई कशाला करता उत्तरे द्यायला आता पाच वर्षे वेळ आहे. योग्यवेळी योग्य उत्तरे देईन,’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.