भविष्यात सोलर ऊर्जेशिवाय पर्याय नाही
By Admin | Updated: May 20, 2016 00:03 IST2016-05-19T22:32:20+5:302016-05-20T00:03:49+5:30
पृथ्वीराज चव्हाण : किसन वीर कारखान्यात फुड ग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मत

भविष्यात सोलर ऊर्जेशिवाय पर्याय नाही
भुईज : ‘येत्या तीन ते सात वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सर्व वाहने हद्दपार करावी लागणार असून, सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांशिवाय पर्याय राहणार नाही. कार्बनडायआॅक्साईडच्या भयानक जागतिक समस्येवर मात करण्यासाठी संपूर्ण जगात अब्जावधी रुपये खर्च केले जात असून, त्या संशोधनाचे फलित म्हणून हा बदल होणार आहे. अशा परिस्थितीत किसन वीर कारखान्याने कार्बनच्या जागतिक समस्येवर मात करत फुडग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्प उभारून एक पाऊल पुढे टाकले आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किसनवीरनगर (भुर्इंज) येथे केले.
किसन वीर साखर कारखान्याने अल्पावधीत उभारलेल्या प्रतिदिन बारा टन क्षमतेच्या फुड ग्रेड कार्बनडायआॅक्साईड प्रकल्पाचे उद्घाटन आणिफॉस्पो कंपोस्ट खत विक्रीचा शुभारंभ पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, आमदार आनंदराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकराव गाढवे व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
मदन भोसले म्हणाले, ‘किसन वीर कारखान्याने विविध उपक्रम आणि पूरक उद्योग उभारताना नेहमीच पर्यावरणपूरक भूमिका घेतलेली आहे. फुडग्रेड कार्बनडायआॅक्साईड निर्मिती प्रकल्प हा त्याचाच भाग आहे. व्यवस्थापनाने दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या कामासाठी पोकलेन मशीन दिलेले असून, हिवरे येथे या मशीनने झालेल्या कामामुळे साडेतीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. रासायनिक खतांचे प्रमाण कमी करण्यासाठीफॉस्पो कंपोस्ट खतनिर्मिती सुरू केलेली आहे. पाणी बचतीसाठी व्यवस्थापनाने सातत्याने प्रयत्न केलेले असून, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.’
बास्को इंडियाचे संचालक हिरेन शहा आणि डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, केशवराव पाडळे, लालसिंग जमदाडे, शेखर जमदाडे, केतन भोसले, रोहित जगदाळे, विराज शिंदे, शंकरराव पवार, सुनील शिवथरे, हणमंत गायकवाड, प्रताप देशमुख, रमेश इथापे, नारायण भोसले, शंकरराव घाडगे, सुनील भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)