भादेत अपघात नव्हे घातपातच!
By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T22:16:28+5:302014-11-28T00:14:47+5:30
खुनाचा गुन्हा : मृताचे बूट पुलाखालील ओढ्यात आढळणे संशयास्पद

भादेत अपघात नव्हे घातपातच!
शिरवळ : भादे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी आढळून आलेल्या आढळून अज्ञात युवकाच्या मृतदेहासंदर्भात पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती; मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून या युवकाचा खून झाला असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत.
चार दिवसांपूर्वी शिरवळ-लोणंद रस्त्यावर अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा मृत्यू झाला असावा, असे नमूद केले होते; मात्र घातपाताची शक्यता नाकारली नव्हती.
‘टिंकू’ श्वानपथकाला घटनेनंतर तेथे पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वान थोड्याच अंतरावर घुटमळले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली होती.
दरम्यान, घटनास्थळावरील परिस्थितीचा अंदाज घेऊन व स्थानिक चौकशीवरून पोलिसांनी खंडाळा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून संबंधित युवकाची ओळख पटलेली नाही. संबंधित युवकाच्या संदर्भात परिसरात अफवांना ऊत आला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खंडाळा पोलीस निरीक्षक अशोक शेळके अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अशी बदलली तपासाची दिशा
घटनास्थळी आढळलेल्या संशयास्पद परिस्थितीमुळे तपासाची दिशा बदलली. मृतदेहाच्या खिशात काहीही न मिळणे, मृताचे बूट मृतदेहाजवळ सापडण्याऐवजी पुलाखालील ओढ्यात सापडणे आदी बाबींमुळे संशय बळावला आहे. मृत युवकाच्या हातावर जखम असून, त्याला टाके घालून वर बँडेज लावले आहे. अशा प्रकारचे बँडेज फक्त सरकारी दवाखान्यांतच उपलब्ध असते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तपास करण्यात येत असून, परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये हरवलेल्या व्यक्तींसंदर्भातील नोंदींचाही आधार घेतला जात आहे.