...तर या लांडग्याचा गळा घोटला असता!

By Admin | Updated: August 1, 2016 00:52 IST2016-08-01T00:52:26+5:302016-08-01T00:52:26+5:30

दबलेल्या भावनांचा हुंकार : कोरेगाव तालुक्यातील निषेध सभेनंतर मूक मोर्चा

... then this wolf would have strangled! | ...तर या लांडग्याचा गळा घोटला असता!

...तर या लांडग्याचा गळा घोटला असता!

वाठार स्टेशन : गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नराधमामुळे गावाची एवढी मोठी बदनामी झाली. खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयातच एका चिमुकलीच्या इज्जतीवर त्या नराधमाने घाव घातला. या नराधमाने जो अपराध केला त्याला फक्त फाशीचीच शिक्षा द्या साहेब.. आज छत्रपती शिवराय असते तर या लांडग्याच्या गळ्याचा घोट घेतला असता,’ अशा भावनिक शब्दात रविवारी पीडित मुलीच्या गावातील अनेक महिलांनी चार दिवस दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
गावातील एका मंदिरात रविवारी सकाळी नऊ वाजता सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली या निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपसरपंच, वाठार ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपसरपंच म्हणाले, ‘या घटनेला दुजोरा देत आपण दोन दिवसांपूर्वीचा आरोपी आपण मोठ्या धाडसानं अवघ्या ३० मिनिटांत पकडला; पण तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत या पीडित कुटुंबाला अजूनही न्याय मिळाला नाही.
या गुन्ह्याची फाईल पोलिसांनी पुन्हा उघडून तपास करावा. संबंधित आरोपीस ताब्यात घेतलं तर आम्ही आपली मिरवणूक काढू.’
सरपंच म्हणाल्या, ‘गावच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या नराधमास फाशीवर लटकवावे. या गावात असा नराधम पुन्हा पैदा होऊ नये, अशा पद्धतीने पोलिस प्रशासनाने या आरोपीबाबत सक्षम कागदपत्र सादर करावेत. पीडित कुटुंब अतिशय गरीब आहे.
या मुलीच्या भविष्यासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी गावातील सर्वांनी या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. या कुटुंबासाठी दहा हजारांची मदत त्यांनी जाहीर केली.’
यावेळी अनेक महिलांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान, या निषेध सभेस महिलांची गर्दी मोठी होती. अनेक महिलांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. सभेनंतर गावातून मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
निषेध सभेच्या ठिकाणी वाठार स्टेशन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर)
जुनी जखम भळभळली...
कोरेगाव तालुक्यातील याच गावात तीन वर्षांपूर्वी एका २० वर्षीय मुलीबाबत अत्याचाराची घटना घडली होती. त्यावेळी गाव एक झालं नव्हतं. केवळ आमचे एकटे कुटुंब लढत होते. या घटनेतील आरोपी आजही गावातून मोकाट फिरत आहे. ही वेदना आमच्या मनात आजही सलत आहे. या गुन्ह्याचाही प्रथम शोध घ्यावा. त्यावेळी अशीच एकी दाखवली असती तर आजची ही घटनाच घडली नसती, अशा भावना गावातील एका महिलेने व्यक्त करत पोलिसांना तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा शोध घेण्याचे पुन्हा आव्हान केले.
आरोपीविरोधात सक्षम पुरावे हाती : निकम
दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या आरोपीवर यापूर्वी एका महिलेवर केलेल्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. गावात वावरताना त्याची नजरही नेहमीच वासनेची असायची, असे असतानाही गावातील कोणतीच महिला या आरोपीच्या विरोधात उभी राहण्याची हिंमत करू शकली नाही. खरंतर हेच धारिष्ठ यापूर्वी दाखवले असते तर असा नराधम या घटनेपासून परावृत झाला असता. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणे चुकीचे आहे. ‘अन्यायाविरोधात पेठून उठा, संघर्ष करा, पोलिस तुमच्या पाठीशी असतील,’ अशी ग्वाही देत घडलेल्या घटनेत आरोपीविरोधात सक्षम पुरावे मिळाले आहेत; पण अजूनही काही साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे येत नाहीत,’ अशी खंत पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी व्यक्त केली.
अत्याचार रोखण्यासाठी समाजाने पुढे यावे : शेळके
साखरवाडी : ‘राज्यात महिला व मुलींवरील अत्याचारामध्ये वाढ होत असताना ते रोखण्यासाठी शासनाबरोबर समाजानेही पुढे येऊन या अपप्रवृत्तींना आळा घातला पाहिजे. महिला-मुलींनीही आता मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन निर्भया बनले पाहिजे,’ असे प्रतिपादन फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए. बी. शेळके यांनी केले.
येथील साखरवाडी विद्यालयामध्ये समुपदेशन कार्यक्रमांतर्गत उपस्थित आठवी ते दहावीच्या विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी साखरवाडी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भोसले, साखरवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पाटील, महानंदचे संचालक डी. के. पवार, मुख्याध्यापक एस. एस. चांगण उपस्थित होते.
शेळके म्हणाले, ‘मुली व महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत असताना शासनाने अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून अधिक कडक कायदे केले आहेत. मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची व छेडछाडीची तक्रार आपले पालक अथवा पोलिसांकडे लगेच करून निर्भया बनले पाहिजे. जेणे करून अशा गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा करता येईल. यापुढे महिलांवरील अत्याचाराबाबतची कोणतीही घटना दुर्लक्षित होणार नाही.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आता प्रतिसाद (एएसके) हे महिलांसाठी अ‍ॅप सुरू करण्यात आले असून, याद्वारे छेडछाडीसह अत्याचाराबाबत तातडीने पोलिस यंत्रणा आपल्या मदतीसाठी धावून येणार आहे. यापुढे महिला व मुलींनी निर्भया बनून अपप्रवृत्तींना प्रतिकार करीत त्यांचा बिमोडसाठी पुढे यावे, पोलिस खाक्या त्यासाठी सदैव आपले पाठीशी राहील.
जयराम भोसले यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे मुख्याध्यापक चांगण यांनी स्वागत केले. विठ्ठल वीरकर, सतीश दडस उपस्थित होते. (वार्ताहर)
कलेढोण बंद
मायणी : कोरेगाव तालुक्यातील एका गावामध्ये पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी कलेढोण बाजारपेठ बंद ठेवून निषेध फेरी व सभा घेतले.कलेढोण येथील नवचैतन्य हिंदू-मुस्लीम एकता मंडळ व चौंडेश्वरी नवराय मंडळ यांच्या सभासदांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांना कोरेगाव तालुक्यातील गावामध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती देऊन बंदचे आवाहन केले होते. यात व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. व त्यानंतर घेण्यात आलेल्या निषेध सभेत अनेकांनी निषेध व्यक्त केला. (वार्ताहर)
 

Web Title: ... then this wolf would have strangled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.