‘त्यांनी’ केलेला विकास शाश्वत नाही--
By Admin | Updated: January 2, 2015 00:23 IST2015-01-01T21:38:09+5:302015-01-02T00:23:52+5:30
‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’: विलासराव उंडाळकर

‘त्यांनी’ केलेला विकास शाश्वत नाही--
कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणाला नैतिक अधिष्ठान नसल्याचा आरोप
कऱ्हाड : ‘आगामी ५० वर्षांचा विचार करून कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाला आपण विकासाचे रोल मॉडेल बनविले. या मतदारसंघात नव्या आमदारांना गटारे अन् गल्लीबोळातील रस्ते वगळता करण्यासारखे काही विकासकामे ठेवलेले नाही. चव्हाण हे चार वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र, नैतिक अधिष्ठान नसल्याने व दलालामार्फत राजकारण केल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी शाश्वत असे काहीही करू शकले नाहीत,’ अशी टीका माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केली.
नांदलापूर येथे आभार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अशोकराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, अॅड. अशोक मोहिते, कऱ्हाड तालुका सहकारी खरेदीविक्री संघाचे संचालक शेखर शिर्के, विश्वास निकम, सरपंच विलास शिर्के, उपसरपंच सुरेश शिंंदे, पांडुरंग बोंद्रे, दिग्गू मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशोकराव थोरात म्हणाले, ‘संधीसाधू राजकारण लोकांसाठी संकट ठरते. कराडमधील शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न असो, अथवा मलकापुरातील वाढीव घरपट्टी हे प्रश्न संधीसाधू राजकारणामुळेच वाढले. घरपट्टीवाढी संदर्भातील सुनावणीलाही लोकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
धनाजी काटकर, विश्वास निकम यांनी मनोगत व्यक्त केले. शेखर शिर्के यांनी प्रास्ताविक केले. जयवंत शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘पृथ्वीराज चव्हाण सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री’
उंडाळकर म्हणाले, ‘दक्षिणेत माझा पराभव झाला; पण मी पराभवाने खचलेलो नाही. मात्र, कोणत्या प्रवृत्तीचा विजय झाला व तो कसा झाला, याबाबत येथील जनतेमध्ये प्रबोधन झाले पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. चार वर्षांची सत्ता त्यांनी राजकीय जिरवाजिरवीसाठी वापरली. इतर पक्षांना संपवताना स्वत:चा पक्षही संपविला. लाचारांची फौज घेऊन फार काळ राजकारण करता येत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी राजकारणात सजग राहिले पाहिजे.’