नागनाथवाडी येथे कांद्याच्या गोटांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:27+5:302021-02-13T04:38:27+5:30
पुसेगाव : नागनाथवाडी (ता. खटाव) येथील दत्तात्रय प्रभाकर गुरव (रा. नागनाथवाडी, पो. लालगुण, ता. खटाव) यांनी मालकीच्या चावर नावाच्या ...

नागनाथवाडी येथे कांद्याच्या गोटांची चोरी
पुसेगाव : नागनाथवाडी (ता. खटाव) येथील दत्तात्रय प्रभाकर गुरव (रा. नागनाथवाडी, पो. लालगुण, ता. खटाव) यांनी मालकीच्या चावर नावाच्या शिवारातील दोन गुंठे क्षेत्रात त्यांनी कांदा बीजोत्पादन केले होते. या पिकाला गोंडे लागून पीक जोमात आले होते. त्यात जवळपास वीस किलो कांदा बी उत्पादन निघाले असते. मात्र या कांदा बीजोत्पादन पिकावर अज्ञातांची वक्रदृष्टी पडली. सोमवारी (दि. ८) रात्री अज्ञातांनी या पिकाचे गोंडे कापून नेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यंदा रब्बी हंगामातील कांद्याची रोपे पावसाच्या तडाख्यात सापडून खराब झाल्याने सरासरी चार हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे कांदा बी खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील वर्षाची कांदा लागवड करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट व्यवस्थापन करून कांदा बीजोत्पादन पिके जोमात आणली आहेत. मात्र, रात्रीच्यावेळी अज्ञात शेतात येऊन पिकाचे नुकसान करत असल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पुसेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील प्रतिबंधक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जगताप करीत आहेत.