सातारा : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत शाळेतील शिक्षकानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. या घटनेमुळे साताऱ्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित शिक्षकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक परप्रांतीय कुटुंब मोलमजुरीच्या निमित्ताने साताऱ्यात स्थायिक झाले आहे. त्यांची ११ वर्षांची मुलगी साताऱ्यातील एका शाळेत दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी सकाळी त्यांची मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. संबंधित बत्तीस वर्षांच्या शिक्षकाने सकाळी साडेदहाच्या सुमारास मुलीला एकटीला वर्गात बोलावून आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्या शिक्षकाने तिच्याशी अश्लील कृत्य केले.काही वेळानंतर तिला शिक्षकाने वर्गाबाहेर सोडले. या प्रकारामुळे पीडित मुलगी भयभीत झाली. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. हे एकून वडिलांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ मुलीला घेऊन सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार वडिलांनी पोलिसांना सांगितला.त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकावर विनयभंगसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्यावर कडक कारवार्इ करावी, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे.
धक्कादायक! शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, वर्गातील दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:43 IST