सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले. या घटनेकडे निव्वळ आत्महत्या म्हणून न पाहता, आता संशयाची सुई ‘खाकी’ आणि ‘खादी’भोवती फिरू लागली आहे. अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी ही ‘संस्थात्मक हत्या’ असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर महिलेने पत्र लिहून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या पत्राचा दुजोरा देत या प्रकरणात आता माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जोडले जाऊ लागले आहे. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे.फलटणमधील पीडितेच्या आत्महत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मंडळी व पीडितेच्या नातेवाइकांनी एका वाहिनीच्या चर्चासत्रात व्यक्त केली.
आमच्या मुलीला वारंवार पोस्टमार्टमची कामे दिली जात होती. माजी खासदारांच्या दोन पीएंनी पोस्टमार्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून दबाव आणला होता. ते तिने तिच्या पत्रात नमूद केले आहे. तिने केलेल्या अर्जाला उत्तर न देता उलट तिची चौकशी लावण्यात आली. या प्रकरणातील दोषींना फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा नको. - पीडितेचे नातेवाईक
पती दिगंबर आगवणे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आर्थिक व्यवहारातून या मैत्रीत वादाची ठिणगी पडली. त्यानंतर पतीला अटक झाली. माझ्यावर ‘मोक्का’सह १२ गुन्हे आणि पतीवर २५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले. मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पतीला व आमच्या कुटुंबाला मदत करणाऱ्यांनाही त्यांनी त्रास दिला. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. - जयश्री आगवणे, पीडित कुटुंब, फलटण
ही एक संस्थात्मक हत्या आहे. हे मी जबाबदारीने बोलत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे क्लिन चीट देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्यायालयाच्या खुर्चीत बसू नये. हत्या प्रकरणातील दोन आरोपी सहज पोलिसांत कसे हजर होतात? पीडित मुलीने चार पानी पत्रातून अनेक कारनामे उघड केले आहेत. या पत्रात ज्यांची नावे आहेत, ते अधिकारी व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावे. - सुषमा अंधारे, प्रवक्त्या, उद्धवसेना
डॉक्टर मुलीचे नातेवाईक येण्याअगोदरच तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तिने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली, ते हॉटेल रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या निकटवर्तीय असलेल्या भोसले नामक व्यक्तीचे आहे, जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. फलटणचे पोलिस ठाणे हे ‘स्वराज्य’ कारखान्याचे वसुली केंद्र आहे. या वसुली केंद्रात मुकादमांना आणून दबाव टाकून वसुली केली जाते. - मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
पुणे येथे झालेल्या ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणात डॉक्टर व पोलिस दोघांनी समझोता केला. याचाच अर्थ या प्रकरणात राजकीय दबाव होता, हे सिद्ध होते. कोणताही पक्ष सत्तेत असला तरी सत्तेचा दुरुपयोग करून, यंत्रणेवर दबाव आणून मनाप्रमाणे काम करून घेतले जाते. फलटण आत्महत्या प्रकरणात ज्यांनी-ज्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची चौकशी करून कारवाई करावी. - पी. के. जैन, माजी अपर पोलिस महासंचालक
सरकार कोणाचंही असू द्या, राजकीय व्यवस्थेत काम करणारी व्यक्ती या घटनेचं समर्थन करू शकत नाही. प्रशासनाला सुतासारखं सरळ ठेवलं पाहिजे, ते आम्ही ठेवतो. ही घटना प्रचंड संवेदनशील आहे. याचे राजकारण करू नये. या प्रकरणात माजी खासदार जर दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई होईल. - अजित चव्हाण, सहमुख्य प्रवक्ते, भाजप
Web Summary : A doctor's suicide in Phaltan sparks outrage, with accusations of institutional murder implicating politicians and police. Relatives allege pressure to alter post-mortem reports. Calls for a thorough investigation intensify, demanding justice and accountability for those involved in the tragic incident.
Web Summary : फलटण में एक डॉक्टर की आत्महत्या से आक्रोश फैल गया है, जिसमें राजनेताओं और पुलिस पर संस्थागत हत्या में शामिल होने का आरोप लगाया गया है। रिश्तेदारों ने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलने के लिए दबाव डालने का आरोप लगाया है। मामले की गहन जांच की मांग तेज हो गई है, जिसमें न्याय और जवाबदेही की मांग की जा रही है।