सातारा : ट्रकचा टायर बदलण्यास सांगताना मालक रागाने बोलल्याने क्लीनरने थेट ट्रकमध्ये पेट्रोलचा पेटता बोळा टाकून ट्रकला आग लावली. यात ट्रकचे ६० हजारांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर संबंधित क्लीनरने तेथून धूम ठोकली. ही घटना दि. ३ रोजी रात्री नऊ वाजता बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैक परिसरात घडली.कुमार सूर्यकांत जाधव (वय २७, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) असे पसार झालेल्या क्नीनरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ट्रक चालक प्रणव हणमंत जाधव (वय ३२, रा. चिमणगाव, ता. सातारा) हा व क्लीनर कुमार जाधव हे दोघे गुजरामधून ट्रक घेऊन सांगलीला निघाले होते. ट्रकमध्ये ३५ टन मिठाची पोती होती. साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैक परिसरात आल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. ट्रकचा टायर बदलण्यावरून क्नीनर कुमार जाधव याच्यासोबत मालकाशी फोनवर शाब्दिक बाचाबाची झाली. याचा राग अनावर झाल्यानंतर क्लीनरने चालकाला आज रात्री ट्रक पेटवून देतो, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. परंतु, तो खरोखरच ट्रक पेटवून देईल, असे कोणालाही वाटले नाही. रात्री नऊच्या सुमारास क्लीनर कुमार जाधव हा हातात पेट्रोलची बाटली घेऊन आला. पेटत्या बोळ्यावर पेट्रोल ओतून त्याने तो पेटता बोळा ट्रकमध्ये फेकून दिला. या प्रकारानंतर त्याने तेथून पळ काढला. काही क्षणातच ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील मिठाची पोती जळू लागली. हा प्रकार नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला समजल्यानंतर त्यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली.पाण्याचे फवारे मारून त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. अन्यथा या आगीत संपूर्ण ट्रकसह माल जळून खाक झाला असता. आग आटोक्यात आणूनही सुमारे ६० हजारांचे ट्रकमालकाचे नुकसान झाले. क्लीनर कुमार जाधव याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार धनाजी यादव हे अधिक तपास करीत आहेत.
‘त्याची’ धमकी खरी ठरली..तुमचा ट्रक आज पेटवून देतो, अशी धमकी क्लीनरने मालकाला दिली. रागाच्या भरात तो बोलून गेला असेल, असे मालकाल वाटले. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पण, त्याने धमकी खरी करून दाखवली.