तिसऱ्या दिवशीही थैमान
By Admin | Updated: March 2, 2016 00:47 IST2016-03-01T23:02:48+5:302016-03-02T00:47:20+5:30
महाबळेश्वरात गारांचा पाऊस : फलटण, वाईत दोन जनावरे दगावली; रब्बी पिकांना फटका

तिसऱ्या दिवशीही थैमान
सातारा : सातारा जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले. महाबळेश्वर, पाटणसह वाई तालुक्यातील चांदक व गुळूंबमध्ये गारांसह पाऊस झाला. तर फलटणमध्ये अंगावर वीज पडल्याने एक गाय तर वाई येथे एक म्हैस मृत्युमुखी पडली. कऱ्हाड तालुक्यातील काळेवाडी येथे पिकअप शेडची भिंत कोसळली. कुसूर येथे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने मजुरांचे संसार उघड्यावर पडले. खंडाळा तालुक्यात गहू, ज्वारी ही पिके भुईसपाट झाली असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे मेढ्यासह अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. सातारा शहरातही पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. खटाव, म्हसवड या ठिकाणीही पावसाने हजेरी लावली.
साताऱ्यात ब्लॅकआऊट
सातारा : शहरात मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पश्चिमेकडे अचानक काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट झाला आणि सातारकरांची एकच पळापळ झाली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.
शहरात सकाळपासूनच हवेमध्ये उकाडा जाणवत होता. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. मात्र दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. अचानकपणे सर्वत्र काळोख पसरला. विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. दुपारी चार वाजता पावसाला जोरदार सुरुवात झाली. पाऊस सुरू होताच रस्त्यावरील वाहतूकही रोडावली. वाहने रस्त्या कडेला उभी राहू लागली. तसेच वाहनधारक व पादचारी पावसापासून बचावासाठी निवारा शोधण्यासाठी धावताना दिसत होते.
पोवई नाका, राजवाडा, बसस्थानक, गोडोली, सदरबझारमधील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साठू लागले. जवळपास दीड तास पाऊस कोसळत होता.
सुरुवातीला काही वेळ पाऊस जोरदारपणे पडत होता. मात्र, नंतर पावसाचा जोर ओसरला तशी पुन्हा वाहने सुरू झाली. या पावसामुळे शहरात गारवा पसरला. (प्रतिनिधी)
पाटणमध्ये आंब्याच्या बागांना फटका
पाटण : बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाटण शहर व आसपासच्या गावामध्ये वळीव पावसाचा शिडकावा झाला. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण करून वातावरणात थंडावा केला. मोरगिरी, कोयना, मणदुरे, मल्हारपेठ, मरळी विभागात पावसाने हजेरी लावली.
पाटण तालुक्यातील हापूस आंबा बागायतदारांना या पावसाने चिंतेत टाकले. आंबा झाडांना मोहोर आला आहे. त्यामुळे गारांसह पडलेल्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वीटभट्टीधारकांनी आपल्या भट्ट्या प्लॅस्टिक कागद टाकून झाकून ठेवल्या. मोरगिरी भागातही जोरदार पाऊस झाला. मोसमी पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना परिसरात मात्र वळीवाच्या किरकोळ सरी कोसळल्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
खंडाळ्यात गहू भुईसपाट
खंडाळा : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यात थैमान घातले. मंगळवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली तर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत होता. मात्र आज दुपारनंतर ढगाळ वातावरण गडत झाले. जोराचा वारा सुटला आणि त्याबरोबरच पावसाच्या धारा कोसळू लागल्या. खंडाळ्यासह अहिरे, मोर्वे, वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, शिवाजीनगर, म्हावशी यासह पूर्व भागात जोराचा पाऊस कोसळला.
शेतात असणारी गव्हाची पीके भुईसपाट झाली. तर मका, हरभरा पिकांचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी काढलेल्या हरभऱ्याचे ढिगारे लावण्यात आले होते. पावसाने ते जागीच चिंब झाले. कांदा पिकांची काढणी चालू आहे. त्यामुळे त्याचेही मोठे नुकसान झाले. मोर्वे परिसरात गव्हासह टोमॅटो पिकाचीही पडझड झाली. कुलकळी गळून पडली तर काही ठिकाणी फळेही गळून पडली.
अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे संरक्षण करण्यासाठी धांदल उछाली. तर रस्त्याच्या दुतर्फा तसेच रानात पाणी साचून राहिले होते. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खंडाळ्यातील निंबोनी मळा प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचा पत्रा वाऱ्यांमुळे उडाला. (प्रतिनिधी)