सातारा : सदर बझार येथील मारुती मंदिराकडून कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्याकडे कोणतेच लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी खड्ड्यांना रांगोळीने सजवून पालिका प्रशासनाचा काही महिन्यांपूर्वी निषेध केला होता. याची तातडीने दखल घेत खासदार उदयनराजे भोसले यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे २२ वर्षांनी या रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यावेळी निषेध दर्शविण्यासाठी काढलेल्या रांगोळीचे आता आभारात रूपांतर झाले.परिसरातील महिलांनी रांगोळी रेखाटून खासदार उदयनराजे यांच्यासह ‘लोकमत’चेही विशेष आभार रांगोळीच्या माध्यमातून मानले. सदर बझार पोलिस चौकी ते कॅनॉल रस्ता १९९२ मध्ये डांबरीकरण झाला होता. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचे तीव्र स्वरूपाचे त्रास जाणवत होते. पालिकेलाही या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वारंवार निवेदन दिले होते. नगरसेवकांनाही विनंती करण्यात आली होती; मात्र प्रभाग रचनेमुळे पंचवार्षिक निवडणुकीत हा रस्ता पूर्ण होणार नसल्याचे कयास व्यक्त केले होते. हे नागरिकांना समजल्यानंतर रामबाण उपाय म्हणून खड्ड्यांना सजवून रांगोळी काढली होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उदयनराजे आणि ‘लोकमत’चे आभार मानण्यासाठी रांगोळी रेखाटली. (प्रतिनिधी) कायम दुर्लक्षच!प्रभाग क्रमांक दोनमधील चारही नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात कामे केली. मात्र, हा भाग कोणाच्या अखत्यारित येतो या गोंधळात एकही नगरसेवक या रस्त्याकडे पाहत नसल्याने खासदार निधी मिळाल्यानंतर हे श्रेय नागरिकांनी काढलेल्या निषेधाच्या रांगोळीचाच म्हणावा लागेल. याच रस्त्यावर हनुमान जयंती व दर्ग्यातील उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे या रस्त्याला प्राधान्य देऊन डांबरीकरण करावे, अशी मागणी भक्तांचीही होती. नेमके उदयनराजेंनी हे लक्षात घेऊन तातडीने निधी मंजूर करून नागरिकांचे होणारे हाल संपुष्टात आणले.
नव्या रस्त्यावर आभाराची रांगोळी
By admin | Updated: March 18, 2016 23:53 IST