प्रमोद सुकरे - कऱ्हाड--जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यातून सोसायटी मतदारसंघात पुन्हा एकदा माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर विजयी झाले. त्यांच्या यशाला यावेळी ‘कृष्णा’ शिष्टाईचा हातभार लागल्याचे मानले जाते. तर जनता बँकेचे अध्यक्ष राजेश-पाटील वाठारकरांनी अपेक्षेप्रमाणे दिवंगत विलासराव पाटील-वाठारकरांची जागा मताधिक्याने कायम ठेवली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत यंदा कऱ्हाडातून दोन की तीन संचालक जाणार याविषयी सर्वांना उत्सुकता होती; पण उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माघारीने ती अपेक्षा फोल ठरली. मात्र, दोन संचालकांची परंपरा यावेळीही कायम राहिली. विकास सोसायटी मतदार संघातून विलासराव पाटील-उंडाळकर विरुद्ध पैलवान धनाजी पाटील-आटकेकर असा सामना झाला; पण विधानसभेतील पराभवानंतर या निवडणुकीत उंडाळकरांचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. उंडाळकरांचे अस्तित्व अन् आटकेकरांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती; पण उंडाळकरांनी कित्येक वर्षांपासूनचे आपले जिल्हा बँकेतील अस्तित्व कायम ठेवले. मात्र नवख्या पैलवानाला मिळालेली मते विचार करायला लावणारी नक्कीच आहेत. विधानसभेतील पराभवानंतर उंडाळकरांनी ‘कृष्णा’ उद्योग समूहाचे डॉ. अतुल भोसले गटाशी शिष्टाई केली. त्याचा निश्चितच फायदा उंडाळकरांना या निवडणुकीत झाला. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उंडाळकरांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात ठाकलेल्या पॅनेलला छुपा पाठिंबा देऊन जिल्हा बँक निवडणुकीच्या दृष्टीने काही मतांची बेरीज केली. पराभवाची जखम ताजी असल्याने बाळासाहेबांच्या उत्तरेतील विरोधकांची उंडाळकरांना आपसूक मदत झाली. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तरीही पैलवान धनाजी पाटील यासारख्या नवख्या उमेदवाराला आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील आदींनी बळ दिले. त्यामुळे ५३ मतांचा टप्पा त्यांनी गाठला; पण या निवडणुकीत प्रथमच उंडाळकरांना मतदारांचे ‘लाड’ पुरविताना पाहायला मिळाले. हा विजय उंडाळकर समर्थकांना आनंद देणाराच आहे. बँका-पतसंस्था मतदार संघातून कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यंदा प्रथमच रिंगणात उतरले होते. विलासराव पाटील-वाठारकर यांच्या निधनानंतर ते लढत होते. त्यामुळे त्यांना मतदार साथ देणार का? याची उत्सुकता होती; पण राजेश पाटलांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ही निवडणूक मताधिक्याने जिंकली. जनता बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात नुकतेच त्यांना यश मिळाले.
काकांना हातभार ‘कृष्णा’ शिष्टाईचा !
By admin | Updated: May 8, 2015 00:18 IST