संशयातून घडले ‘ते’ थरारनाट्य
By Admin | Updated: March 12, 2015 00:02 IST2015-03-11T23:58:08+5:302015-03-12T00:02:46+5:30
पती अत्यवस्थच : पत्नीवर आरे येथे अंत्यसंस्कार

संशयातून घडले ‘ते’ थरारनाट्य
परळी (सातारा) : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने स्वत:चा गळा चिरून घेण्याची थरारक घटना चारित्र्याच्या संशयातून घडल्याचे पत्नीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीमुळे पुढे आले आहे. सातारा तालुक्यातील आरे गावात घडलेल्या या घटनेतील पती अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे, तर पत्नीवर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.आरे गावातील वातावरणात मंगळवारी सायंकाळपासून विचित्र सन्नाटा पसरला आहे. रोहिणी संजय महाडिक (वय ३०) हिने दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर लगेच तिचा पती संजय वसंत महाडिक याने धारदार कटरने स्वत:चा गळा चिरून घेतला. सातारच्या खासगी रुग्णालयात संजयवर उपचार सुरू असून, तो अद्याप अत्यवस्थच आहे. दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून होणाऱ्या जाचहाटामुळेच रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला असून, तालुका पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही नोंदविली आहे. मंगळवारी रात्री चिंचणेरहून माहेरची मंडळी संतप्त होऊन आरे गावात दाखल झाली6; मात्र तालुका पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे या संतापाचा उद्रेक थोपविला गेला.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास रोहिणीवर उरमोडी नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला असून, याविषयी भाष्य करणेही टाळले जात असल्याचे दिसून आले. दरम्यान, महाडिक दाम्पत्याच्या दोन लहानग्या मुली प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत आहेत. (वार्ताहर)