जिल्हा परिषदेच्या सभेत तहकुबीचा ‘अनर्थ’!

By Admin | Updated: March 2, 2016 23:54 IST2016-03-02T23:39:36+5:302016-03-02T23:54:08+5:30

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज : गैरहजर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर फोडले खापर

Terrorism 'disaster' at the Zilla Parishad meeting! | जिल्हा परिषदेच्या सभेत तहकुबीचा ‘अनर्थ’!

जिल्हा परिषदेच्या सभेत तहकुबीचा ‘अनर्थ’!

सातारा : जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित केलेली अर्थसंकल्पीय सभा राष्ट्रवादी सदस्यांनी तहकूब करण्यासाठी भाग पाडले. मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील सभेत हजर नसल्याचे कारण या सदस्यांनी उपस्थित केले. पाटील मुंबईत बैठकीला गेले असल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यायला हरकत नाही, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला; परंतु राष्ट्रवादी सदस्यांच्या मागणीचा आदर करून अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी ही बैठक तहकूब केली.
सभेला सदस्यांचे संख्याबळ पुरेसे होते; परंतु काही महिन्यांपासून पदाधिकारी राजीनाम्याच्या कारणावरून राष्ट्रवादीअंतर्गत पडलेल्या दोन गटांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणातूनच बुधवारी सभा तहकूब करावी लागण्याचा प्रकार घडल्याची चर्चा जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात सुरू होती.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अनिल देसाई, नितीन भरगुडे-पाटील या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत ही सभा घेता येणार नाही, असे मत सभागृहापुढे मांडले. त्यावर विरोधी काँगे्रस व भाजपच्या सदस्यांमधून या मताला विरोध झाला. जयवंत जगताप, दीपक पवार या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सभा घेऊ शकतात, असा पवित्रा घेतला. जिल्हा परिषद सभेत नवनियुक्त सदस्य व यशस्वी व्यक्ती, संस्था यांचे सत्कार होऊ द्या, त्यानंतर आपल्या मताचा विचार केला जाईल, असे अध्यक्ष सोनवलकर यांनी जाहीर केले.
हे सत्कार संपल्यानंतर राष्ट्रवादीचे देसाई, भरगुडे-पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याशिवाय ही सभा घेऊ नका, असे सांगितले. भरगुडे यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल झाल्यापासून दहा महिन्यांच्या कालावधीत खंडाळ्याकडे फिरकलेही नाहीत, असा आरोप केला. अध्यक्षांनी सभा तहकूब करावी, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांनी या मागणीला जोरदार विरोध करताना ‘अध्यक्षांनी सभा तहकूब करण्यापूर्वी सबळ कारण द्यावे,’ अशी मागणी केली.
सभागृहात गोंधळ होऊ लागल्यानंतर अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी, सभागृहातील बहुतांश सदस्यांचे मत सभा तहकूब करण्यात यावी, असे आहे. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)


सात दिवसांत पुन्हा सभा
जिल्हा परिषदेची सभा बुधवारी तहकूब केली असली, तरी पुन्हा सात दिवसांत ती बोलावली जाणार असल्याचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Terrorism 'disaster' at the Zilla Parishad meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.