बहुले विभागात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:36+5:302021-08-25T04:43:36+5:30
बहुले येथील जयसिंग नाना रेवडे यांचा तुंगीचा माळ नावाच्या शिवारात जनावरांचा गोठा असून, तेथील रेडकावर हल्ला करून बिबट्याने त्याला ...

बहुले विभागात बिबट्याची दहशत
बहुले येथील जयसिंग नाना रेवडे यांचा तुंगीचा माळ नावाच्या शिवारात जनावरांचा गोठा असून, तेथील रेडकावर हल्ला करून बिबट्याने त्याला फस्त केले. सकाळी ही बाब जयसिंग रेवडे यांच्या निदर्शनास आली. रविवारीही गारवडे येथील पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला होता. मारूल हवेली, बहुले परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, तीन बिबटे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील ग्रामस्थांना त्यांचे वारंवार दर्शन होत आहे. खाद्याच्या शोधात फिरणारा बिबट्या आता दिवसाढवळ्या नरजेस पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, विभागात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून आहे. दिवसेंदिवस त्याचा लोकवस्तीतील शिरकाव वाढत आहे. त्यामुळे महिला व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे, दुपारच्या वेळी, सायंकाळी व रात्रीच्या सुमारास कधीही बिबट्या नजरेस पडत आहे. काही वेळेला बिबट्या रस्त्यावरून वाहनधारकांना आडवा जात आहे. तर काही वेळेला घराशेजारीच त्याचे दर्शन होत आहे. पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकार सुरूच असल्याने पशुधन धोक्यात आले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.