दहा वर्षांनंतर केसांना लागली कात्री !
By Admin | Updated: August 12, 2015 20:48 IST2015-08-12T20:48:16+5:302015-08-12T20:48:16+5:30
मसूरमध्ये जटा निर्मूलन : अंधश्रध्दा निर्मूलन समितीने उचलले पाऊल

दहा वर्षांनंतर केसांना लागली कात्री !
मसूर : मसूर, ता. कऱ्हाड येथे कोपर्डे हवेली येथील अनुसया यशवंत शिरतोडे या महिलेचे जटानिर्मूलन सातारा जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सरचिटणीस मारूती थोरात यांनी केले. पक्षीतज्ज्ञ डॉ. सुधीर कुंभार, प्रा. अल्केश ओहळ, सुहास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कुंभार म्हणाले,‘आज २१ व्या शतकात भारत महासत्ता होवून जगावर राज्य करण्याच्या प्रयत्नात असताना अंधश्रध्दा निर्मूलन एक समस्या होवून बसली आहे. अंधश्रध्देने ग्रासलेल्या या लोकांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.’ थोरात म्हणाले,‘आपल्या गावामध्ये अशा काही महिला असतील तर त्यांचे मतपरिवर्तन करून आम्हाला सांगावे. त्यांना जटाविषयी मार्गदर्शन करून त्या काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती प्रयत्न करेल.’
गेल्या १० वर्षांपासून अनुसया शिरतोडे या महिलेने जटा ठेवल्या होत्या. मतपरिवर्तन करण्यासाठी बाजीराव चव्हाण, इंदूताई चव्हाण यांनी प्रयत्न केले.
भीमराव थोरात, सागर शिरतोडे, विठ्ठल शिरतोडे, तानाजी थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)