मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:55+5:302021-02-18T05:13:55+5:30
आनंदराव शामराव साळुंखे (रा. रुवले, ता. पाटण) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याबाबत सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा ...

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी
आनंदराव शामराव साळुंखे (रा. रुवले, ता. पाटण) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याबाबत सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही क्षयरोगाने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत ती घरात एकटी असल्याचे पाहून आनंदराव साळुंखे हा तिच्या घरामध्ये गेला. त्याने तिच्यावर अत्याचार करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्याच्या जीपने धडक देऊन आई व वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे पीडितेने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर काही दिवसांनी मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबीयांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिच्याबाबतीत घडलेला प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसात गुन्हा नोंद करून ३ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपी आनंदराव साळुंखे याला अटक करण्यात आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. डी. चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने सतरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
- चौकट
... अशी आहे शिक्षा
न्यायालयाने आरोपीला दोषी धरून अनाधिकाराने घरात प्रवेश केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस कैद, धमकी दिल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस कैद आणि अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड पीडित मुलीला भरपाई तसेच दंड न दिल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.