वणवा लावल्याने जाळगेवाडीतील दोघांना दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:47+5:302021-04-01T04:40:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात शुक्रवारी दुपारी पाडळोशी व जाळगेवाडी येथे खासगी जागेत लावलेली आग ...

वणवा लावल्याने जाळगेवाडीतील दोघांना दहा हजारांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात शुक्रवारी दुपारी पाडळोशी व जाळगेवाडी येथे खासगी जागेत लावलेली आग वन विभागाच्या हद्दीत गेल्याने अनेक वनऔषधी झाडे व जंगली सरपटणारे प्राणी या आगीत जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वणव्यांमध्ये कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक होत आहे. मात्र, आग आटोक्यात आणताना वन विभागाची त्रेधा उडू लागली आहे. दरम्यान, वणवे लावणाऱ्या जाळगेवाडी येथील दोघा शेतकऱ्यांचा शोध घेत कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी चार वाजता पाडळोशी व जाळगेवाडी येथील खासगी क्षेत्रात आग लावण्यात आली. ही आग वन विभागाच्या हद्दीत गेल्याने कोट्यवधी रुपयाची वनसंपदा जळून भस्मसात झाली. पाडळोशी येथील खासगी क्षेत्रातील डोंगराला लावलेली आग ही धायटी कांबळवाडीनजिक असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्राला लागून असलेल्या खासगी जागेत असलेल्या घराच्या दिशेने येऊ लागली होती. मात्र, गावातील लोकांनी आग आटोक्यात आणल्याने अनेक घरे यामुळे वाचू शकली तर जाळगेवाडी येथील मारुती ज्ञानू पवार व प्रवीण गणपत पवार हे पवार दरा नावाच्या शिवारातील शेताचा बांध जाळत असताना ही आग वनश्रेत्र गट नंबर ४४४ला लागल्याने वन कर्मचारी व ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली.
वनश्रेत्रपाल विलास वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी करुन पवार कुटुबियांवर कारवाई करत अटक केली. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई वनरक्षक विलास वाघमारे व वनमजुरांनी केली.
चौकट :
जाळगेवाडीतील वणवा लावणारे सापडले आता प्रतीक्षा आहे ती पाडळोशीकडे लावलेल्या वणव्यातील समाजकंटकांवर ठोस कारवाईची. वन विभाग पाडळोशीत वणवा लावलेल्या समाजकंटकाचा तपास करत आहे. विभागात यापुढे वणवा लावल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत वन विभागाने दिले आहेत.