दहा तोळ्यांचे दागिने लंपास

By Admin | Updated: July 26, 2015 00:02 IST2015-07-25T23:51:25+5:302015-07-26T00:02:55+5:30

कालवडेत घरफोडी : कुटुंबीय झोपल्यानंतर चोरट्यांचा डल्ला

Ten pieces of lace jewelry | दहा तोळ्यांचे दागिने लंपास

दहा तोळ्यांचे दागिने लंपास

कऱ्हाड : कालवडे, ता. कऱ्हाड येथे घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत सुभद्रा गणपती मोटे (वय ६०) यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालवडे येथील बेघर वसाहतीत सुभद्रा मोटे या पती, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झोपी गेले. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरातील इतर खोल्यांमध्ये पाहिले असता एका खोलीतील पेटी चोरीस गेल्याचे व साहित्य इतरत्र विखुरल्याचे दिसून आले.
संबंधित पेटीमध्ये एक प्लास्टिकचे बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये चार तोळ्यांचा हार, दीड तोळ्याची सोनसाखळी, दोन तोळ्यांच्या अंगठ्या यासह सुमारे दहा तोळ्यांचे दागिने होते.
मोटे कुटुंबीयांनी घराच्या आसपास त्या पेटीचा शोध घेतला. त्यावेळी घराच्या पाठीमागील बाजूस त्यांना पेटी आढळून आली. मात्र त्यातील दागिन्यांचा बॉक्स चोरट्यांनी लंपास केला होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेची नोंद कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ten pieces of lace jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.