कावडीत आठवड्यात कोरोनाबाधित दहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:12 IST2021-02-18T05:12:59+5:302021-02-18T05:12:59+5:30
पाचगणी : जावळी तालुक्यातील कावडी येथे नव्याने कोरोनाचा शिरकाव झाला असून, एका आठवड्यात दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ...

कावडीत आठवड्यात कोरोनाबाधित दहा रुग्ण
पाचगणी : जावळी तालुक्यातील कावडी येथे नव्याने कोरोनाचा शिरकाव झाला असून, एका आठवड्यात दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावळी तालुक्यातील कावडी येथे नव्याने कोरोना रुग्ण सापडत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात या ठिकाणी पाच रुग्ण सापडले होते. त्याच्या तब्बल दहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पहिला कोरोना रुग्ण ४ फेब्रुवारीस सापडला होता. त्यानंतर त्याच्याच कुटुंबातील व्यक्ती बाधित आली होती. त्यानंतर तेथेच कोरोना साखळी खंडित झाली होती; परंतु पुन्हा शालेय विद्यार्थी बाधित आल्याने त्याच्या कुटुंबातील तीन व्यक्ती बाधित आल्याने एकूण सोळा व्यक्तींच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेतले गेले होते. यामध्ये शेजारचे दोन व्यक्ती व त्यांच्या सहवासातील दोन व्यक्तींचा अहवाल बाधित आला आहे, तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे स्राव उद्या पुन्हा घेतले जाणार आहेत.
कावडी येथे वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सोपान टोनपे पाटील, तहसीलदार राजेंद्र पोळ, वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते तसेच गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी बुधवारी कावडी गावास भेट दिली. त्यावेळी हातगेघर उपकेंद्राच्या आरोग्य समूह अधिकारी डॉ. प्रियांका गोळे, आरोग्य सेवक पी. एम. कुंभार, एस. एस. फरांदे, सर्कल व्ही. एस. पाटणकर उपस्थित होते. यावेळी प्रांतसाहेब टोणपे यांनी नागरिकांना पुन्हा काळजी घेण्याचे आवाहन केले.
फोटो १७कावडी-कोरोना
जावळी तालुक्यातील कावडी येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी भेट देऊन पाहणी केली. (छाया : दिलीप पाडळे)