भेकराला खाताना दहा फुटी अजगर जखमी

By Admin | Updated: July 16, 2016 23:29 IST2016-07-16T22:41:18+5:302016-07-16T23:29:40+5:30

कऱ्हाडात ‘वन्यजीव’कडून उपचार : धानकल गावामध्ये आढळले होते जखमी स्थितीत

Ten feet of python injured while feeding the voracious | भेकराला खाताना दहा फुटी अजगर जखमी

भेकराला खाताना दहा फुटी अजगर जखमी

कऱ्हाड : पाटण तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असणाऱ्या धानकल गावामध्ये तब्बल साडेदहा फूट लांबीचे अजगर आढळून आले आहे. अजगर जखमी अवस्थेत असल्याने वन्यजीवचे अधिकारी व प्राणीतज्ज्ञांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येत आहे. येथील प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी वन्यजीव विभागाने प्रकल्पामध्ये ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरेही बसविले आहेत. या कॅमेऱ्यात अनेकवेळा दुर्र्मीळ प्राणी किंवा प्राण्यांच्या आश्चर्यजनक हालचाली टिपल्या जात आहेत.
पाटण तालुक्यात सह्याद्री प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असणाऱ्या धानकल गावात मोठा अजगर असल्याची माहिती वन्यजीवच्या हेळवाक येथील कार्यालयातील वनक्षेत्रपाल एस. एस. देवकर यांना मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल देवकर यांनी त्याठिकाणी भेट दिली. संबंधित अजगर रस्त्याकडेला पडून असल्याचे व ते जखमी असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. त्यानंतर वनक्षेत्रपाल देवकर यांनी आणखी काही कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी बोलावून घेतले.
अजगराला पकडताना या पथकाला विशेष खबरदारी घ्यावी लागली. जखमी स्थितीत असल्याने त्याच्याकडून जबर हल्ला होण्याची भीती होती. तसेच पकडताना त्यालाही जखमा होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने या अजगराला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या जबड्याला गंभीर इजा झाली असल्याचे दिसले. या जखमेवर तातडीने उपचार न झाल्यास जखम बळावण्याची व त्याठिकाणी संसर्ग होऊन अजगराचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अजगराला हेळवाक येथील कार्यालयात आणले. घटनेची माहिती वन्यजीव विभागाच्या कऱ्हाड कार्यालयात देण्यात आली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी मिलिंद पंडितराव यांच्या आदेशान्वये सर्पमित्र व मानद वन्यजीव रक्षक रोहण भाटे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अजगरावर त्याचठिकाणी प्राथमिक उपचार केले. (प्रतिनिधी)


जबड्याला सहा टाक्यांची शस्त्रक्रिया
कऱ्हाडात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. परिहार यांच्याकडे जखमी अजगरावर उपचार करण्यात आले. अजगराचा जबडा पूर्णपणे फाटला होता. त्यामध्ये त्याच्या तोंडाची हालचाल होत नव्हती. जबड्याचा भाग रक्ताने माखला होता. अखेर डॉ. परिहार यांनी अजगरावर सहा टाक्यांची शस्त्रक्रिया केली असून, सध्या अजगर अन्न खात असल्याचे वन्यजीवच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


बराच वेळ झटापट
अन्न मिळविण्यासाठी अजगरांचा प्रकल्पात वावर असतो. संबंधित जखमी झालेले अजगर धानकल गावच्या हद्दीत एका रस्त्याकडेला आले होते. त्याठिकाणी त्याने एका भेकराला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भेकर व अजगरामध्ये झटापट झाल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. झटापटीनंतर स्वत:ची सुटका करून घेऊन भेकर तेथून निघून गेले. मात्र, जखमी अजगर त्याचठिकाणी पडून होता.


वजन चौदा किलो
अजगर हा परिशिष्ट १ मधील जीव आहे. त्याला कायद्याने मोठे संरक्षण देण्यात आले असून, अजगराच्या संरक्षणासाठी वन्यजीव विभागही प्रयत्न करीत आहे. धानकल येथे जखमी स्थितीत आढळलेल्या अजगराचे वय पाच वर्षांहून अधिक असावे, असा सर्पमित्र रोहण भाटे यांचा कयास आहे. सध्या त्याचे वजन चौदा किलो असून, भविष्यात ते पंचवीस ते तीस किलोपर्यंत होऊ शकते.

Web Title: Ten feet of python injured while feeding the voracious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.