दहा एकरातील पीक गव्यांकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:44+5:302021-02-05T09:15:44+5:30
सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह ...

दहा एकरातील पीक गव्यांकडून उद्ध्वस्त
सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह अन्य पिकांचे शिवार गव्यांच्या कळपाने उद्ध्वस्त केले आहे. निवी (ता. पाटण) येथे घडलेल्या या घटनेने शेतकरी हतबल झाले आहेत.
सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील निवीसह लगतच्या अन्य गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीसह पशुधन अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले असून, प्रतिवर्षी पडीक क्षेत्र वाढत आहे. काही शेतकरी एकत्र येऊन धाडसाने शेती करत असले तरी क्षणात होत्याचे नव्हते होत आहे. निवीतील दहा शेतकऱ्यांनाही दोन दिवसांपूर्वी रात्री असाच अनुभव आला. गावानजीक असलेल्या पट्टी नावाच्या शिवारात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांपूर्वी गहू, कांदे, मका, वाटाणा, हरभरा आदी पिकांची लागवड केली. तसेच शेताभोवती चोहोबाजूंनी काटेरी कुंपण घातले. दररोज शेतकरी डोळ्यात तेल घालून शिवारात जागता पहारा देत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना झोप लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सर्व शेत गव्यांनी फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
विष्णू साबळे, तुकाराम साबळे, पांडुरंग साबळे, सदाशिव साबळे, शंकर साबळे, ईश्वर साबळे, झिंगूबाई साबळे, मारुती साबळे, सतीश साबळे आदी शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
- चौकट
वन विभागाकडून केवळ आश्वासन
जंगलालगत वसलेल्या निवी, कसणी व अन्य गावांना भेडसावणारा वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने जंगलाच्या बाजूने सौरकुंपण घालावे किंवा चर काढावी, अशी मागणी वारंवार होत आहे. त्याबाबत वन विभागाकडूनही आश्वासन दिले जात आहे. मात्र, अद्याप कुंपण किंवा चर प्रत्यक्षात काढण्यात आलेला नाही. धोक्यात आलेली शेती आणि वाढते पडीक क्षेत्र हा त्याचाच परिणाम आहे.