पाईपलाईनसाठी टेलिफोन खांब ढापला!
By Admin | Updated: October 6, 2015 23:46 IST2015-10-06T21:47:36+5:302015-10-06T23:46:55+5:30
चोरीचा ‘पोल’खोल : पळशीमध्ये जलवाहिनीसाठी डांबरी रस्त्याखाली गाडला पाईप

पाईपलाईनसाठी टेलिफोन खांब ढापला!
सातारारोड : चोरी कशा कशाची होईल याचा नेम नाही. चोरट्याचा डोळा भलत्याच वस्तूवर असू शकतो. घर, दुकान, बँकेत चोरी झाल्याचे आजवर ऐकले असेल पण कोरेगाव तालुक्यातील पळशीमधील एकाचा चक्क शासकीय वस्तूंवरच डोळा आहे. त्याने रस्त्याकडेला पडलेला टेलिफोनचा खांबच ढापला आणि चक्क जलवाहिनीसाठी तो डांबरी रस्त्याखाली गाडला. या प्रकारामुळे कोरेगाव तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन येथे भारत दूरसंचार निगमचा खांब उभा होता. तो खांब वाहतुकीस अडथळा होत असल्याने पळशी ग्रामपंचायतीने तो खांब काढून टाकला होता. रस्त्याच्या कडेला पडलेला खांबावरच एका ग्रामस्थाने डोळा ठेवला होता. गावातील स्वत:च्या घरात जलवाहिनी घेत असतानाच पवार या गृहस्थाने तो खांब रातोरात लांबविला असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. जलवाहिनी घरात नेण्यासाठी रस्ता ओलांडण्यासाठी या महाशयाने तो खांब रस्त्याखाली गाडला. यासंदर्भात ग्रामस्थांनी भारत दूरसंचार निगमच्या कोरेगाव कार्यालयात ३ सप्टेंबर, २०१५ रोजी अर्ज केला होता. मात्र, अद्यापही कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. या संदर्भात विविध पातळीवर तक्रारी अर्जही केले आहेत.
सरकारी वस्तू म्हणजे सार्वजनिक मालमत्ता. तिचा योग्य कारणासाठी वापर व्हावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. भलेही या वस्तू रस्त्यावर असतील म्हणून ती स्वार्थासाठी घेऊन जाणे योग्य नाही. याची जाण असलेल्या काही ग्रामस्थांनी शासकीय मालमत्तेच्या चोरीसंदर्भात
शासकीय पातळीवर लढा सुरू केला आहे.
याप्रकरणी शासकीय यंत्रणांनी वेळीच दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
लोकशाही दिनातही संबंधिताविरुध्द तक्रार
सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाला शासकीय यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही दिन आयोजित केला जातो. या लोकशाही दिनातही संबंधित व्यक्तीच्या कारनाम्याची तक्रार गेलेली आहे. येथील राहुल शिंदे यांना समाजकल्याण यशवंत घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाचे काम पूर्ण झाले असून त्याची नोंद करण्यासाठी पळशी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. मात्र, वेळोवेळी खोटा तक्रार अर्ज करुन घरकुलाची नोंद करण्यात अडथळा आणला जात आहे. त्यामुळे या घरकुलाची नोंद केली जात नाही. संबंधित पवार याच्यावर कारवाई करण्याचा अर्ज शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांकडेही केला आहे.
या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या तक्रारी करण्याची सवय आहे. यामुळे ते ग्रामपंचायतीकडे माझ्याविरोधात तक्रारी करत आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन कारवाई करावी.
- राहुल शिंदे, ग्रामस्थ पळशी