घातपाताच्या उद्देशाने युवकाचे अपहरण!

By Admin | Updated: December 2, 2015 00:41 IST2015-12-01T22:58:08+5:302015-12-02T00:41:29+5:30

उंडाळेतून संशयास्पदरीत्या बेपत्ता : नागज घाटात आढळली रक्ताने माखलेली गाडी, मोबाइल व बूट

Teenage abduction for the purpose of the death! | घातपाताच्या उद्देशाने युवकाचे अपहरण!

घातपाताच्या उद्देशाने युवकाचे अपहरण!

कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील विजयसिंह सुखदेव पाटील (वय २८) या युवकाचे घातपाताच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजयसिंह हा शनिवारी गाडीतून प्रवासी घेऊन विट्याकडे जातो, असे सांगून गेला होता. मात्र, अद्याप तो सापडलेला नाही. मात्र, सोमवारी कवठेमहांकाळ येथील नागज फाटा येथे विजयसिंहची गाडी बेवारस स्थितीत आढळून आली असून, त्यामध्ये रक्ताचे डाग व रक्ताने माखलेला मोबाइल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत विजयसिंहच्या नातेवाइकांनी फिर्याद दिली आहे. विजयसिंहचे घातपाताच्या उद्देशाने अपहरण झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंगळवारी सायंकाळी कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे पथक तपासासाठी कवठेमहांकाळला रवाना झाले. पोलीस व नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, उंडाळे येथील विजयसिंह याची प्रवासी वाहतूक गाडी असून, तो परगावच्या प्रवाशांच्या भाडेतत्त्वावर ने-आण करतो. ‘विट्याहून मजूर आणायचे आहेत,’ असे सांगून शनिवारी विजयसिंह घरातून बाहेर पडला. त्यानंतर कऱ्हाडात पोहोचल्यावर भाऊ वैभव याच्याशी त्याचे मोबाइलवर बोलणे झाले. ‘कऱ्हाडातून विट्याच्या दिशेने निघालो,’ असल्याचे त्यावेळी विजयसिंहने सांगितले होते. त्यानंतर कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क झाला नाही. रविवारी दिवसभर तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. त्याच्या मोबाइलवर फोन केले. मात्र, संपर्क झाला नाही. अखेर कुटुंबीयांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशातच सोमवारी कवठेमहांकाळ येथे नागज फाट्यानजीक घाटामध्ये तेथील स्थानिक पोलिसांनी एक गाडी बेवारस स्थितीत आढळून आली. तपासाअंती संबंधित गाडी विजयसिंहची असल्याचे स्पष्ट झाले. गाडीमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग, तसेच बूटही आढळला आहे. गाडीपासून काही अंतरावर विजयसिंहचा रक्ताने माखलेला मोबाइल व रक्ताने माखलेले लोखंडी हत्यारही आढळून आले. मानवी शरीराचा काही मांसल भागही तेथे आढळून आला असल्यामुळे या ठिकाणी घातपाताची शक्यता आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विजयसिंहचे नातेवाइक व मित्रांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधित गाडी व बूट, मोबाईल विजयसिंहचा असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाइकांसह पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता विजयसिंह कोठेही आढळून आलेला नाही. दरम्यान, मिसिंगची पहिली तक्रार कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात नोंद असल्याने कवठेमहांकाळ येथील पंचनाम्याच्या सर्व कागदपत्रांसह वस्तू तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी कऱ्हाड तालुका पोलिसांना संबंधित कागदपत्र व वस्तू प्राप्त झाल्या असून, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)



पाचजणांकडून मारहाण?
विजयसिंहची गाडी ज्याठिकाणी आढळून आली त्याठिकाणी चार ते पाचजण एका युवकाला मारहाण करीत होते. ही मारहाण काही प्रवाशांनी पाहिली असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली होती, असे विजयसिंहच्या नातेवाइकांनी सांगितले. मात्र, ते कोण होते व विजयसिंहला कशासाठी मारहाण केली, पुढे त्याचे काय झाले, या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत.

भावाला कृष्णा कॅनॉलवरून फोन
शनिवारी कऱ्हाडात आल्यानंतर विजयसिंहचे भाऊ वैभव याच्याशी मोबाइलवर बोलणे झाले होते. विट्याला निघालो असल्याचे व गाडीत पॅसेंजर असल्याचे त्याने वैभवला सांगितले. संबंधित कॉल विजयसिंह कृष्णा कॅनॉल येथे असताना झाल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे.


रक्ताचे
नमुने संकलित

नागज फाटा येथे आढळून आलेल्या विजयसिंहच्या गाडीत व मोबाइलवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तसेच रक्ताने माखलेला लोखंडी कमान पाटाही आढळून आला आहे. या सर्व वस्तूंवरील रक्ताचे नमुने पोलिसांनी संकलित केले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उंडाळे येथील विजयसिंह पाटील हा युवक बेपत्ता असल्याची खबर त्याच्या नातेवाइकांनी उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच कवठेमहांकाळच्या हद्दीत विजयसिंहची गाडी व इतर वस्तू आढळून आल्या आहेत. घातपाताचा संशय असला तरी सर्व शक्यता गृहित धरून आम्ही तपास सुरू केला आहे.
- राजलक्ष्मी शिवणकर,
पोलीस उपअधीक्षक, कऱ्हाड

Web Title: Teenage abduction for the purpose of the death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.