कागदपत्रे फाडून अंगणवाडीत चोरी
By Admin | Updated: April 10, 2015 00:29 IST2015-04-09T22:03:51+5:302015-04-10T00:29:09+5:30
कवठे-केंजळ : दोन महिन्यांपूर्वी शाळेतील कार्यालयातही झाली होती तोडफोड

कागदपत्रे फाडून अंगणवाडीत चोरी
मसूर : कवठे (केंजळ), ता. कऱ्हाड येथे अंगणवाडी क्र. ८५ चे कुलूप तोडून आतील हजारोंचा माल गायब करण्यात आला आहे. तसेच कागदपत्रे फाडण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. यामुळे कवठे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी येथील शाळेत तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, कवठे (केंजळ) येथील अंगणवाडी क्र. ८५ चे कुलूप तोडून अज्ञातांनी साहित्याची नासधूस करत आयसीडीएसची सर्व रजिष्टरे फाडून टाकली आहेत. तर एक वजनकाटा चोरून नेला तर दुसरा तेथेच फोडून टाकला आहे. तसेच स्टिलच्या डीश व दहा ग्लास चोरीला गेले आहेत. टेबलचा ड्रावर उघडून आतील साहित्य विस्कटून टाकले आहे. दवाखान्याने दिलेली तापमापीही फोडून टाकली आहे. महत्त्वाची रजिष्टरे फाडल्याने नुकसान झाले आहे.
याच गावामध्ये फेब्रुवारी महिन्यात श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या कार्यालयामधील संगणक व प्रिंंटर, खुर्च्यांची मोडतोड करत कागदपत्रे वाहत्या पाण्यात फेकल्याची घटना घडली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, सरपंच सुमन यादव, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग यादव, माजी सरपंच लहूराज यादव, संभाजीराव यादव तसेच ग्रामस्थांनी पाहणी केली.
मसूरच्या पोलीस दूरक्षेत्राच्या उपनिरीक्षक रेखा दूधभाते, हवालदार सुधाकर भोसले, एस. जे. घाडगे, एस.पी. साळुंखे यांनी भेट देऊन पहाणी केली. मसूर पोलीस दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
$$्रिपोलिसांनी लवकर तपास करावा...
श्री ज्योतिर्लिंग विद्यालयात अज्ञाताने केलेल्या मोडतोडीच्या घटनेस जवळपास दोन महिने पूर्ण झाले तरी अजून आरोपी सापडले नाहीत. तोपर्यंतच अशी घटना अंगणवाडीत घडली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या समाजविघातक वृत्तींना ठेचून पुढे आणल्याशिवाय अशा घटना बंद होणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून या घटनेचा पर्दाफाश करावा.
- लहूराज यादव, कवठे