शिक्षक बँकेत संघ-समितीतच होणार लढत
By Admin | Updated: June 12, 2015 00:47 IST2015-06-11T21:30:35+5:302015-06-12T00:47:52+5:30
दुरंगीचे चित्र स्पष्ट : २१ जागांसाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात

शिक्षक बँकेत संघ-समितीतच होणार लढत
कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती विरोधी प्राथमिक शिक्षक संघ यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. बँकेच्या २१ जागांसाठी एकूण ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचे निशाण फडकावले आहे. ९ मतदारसंघांत दुरंगी तर १२ मतदारसंघांत तिरंगी लढत होणार, असे राजकीय चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. तरीही मुख्यत: संघविरोधी समिती असाच सामना रंगणार आहे.
माजी आमदार शिवाजीराव पाटील गट तसेच अखिल भारतीय शिक्षक संघ (दोंद गट) या निवडणुकीत कोणाबरोबर जाणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दोंद गट सत्ताधारी समितीबरोबर तर शिवाजीराव पाटील गट संघाबरोबर राहिला आहे. दोन्ही संघ एकत्र आल्याने समितीला सत्ता मिळविणे कठीण होणार, हे निश्चित मानले जात आहे. दोंद गट समितीशी हात मिळवून दोन जागा लढवित आहे. तर समिती १९, शिवाजीराव पाटील गट ९ जागांवर तर थोरात गट १२ जागांवर निवडणूक लढविणार आहे.
सर्वसाधारण गटात उरलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे : कऱ्हाड-पाटण २, नागठाणे ३, आरळे २, परळी ४, वाई २, गिरवी ४, जावळी ३, खंडाळा ४, कोरेगाव २, महाबळेश्वर २, फलटण ४, रहिमतपूर २, खटाव २, मायणी २, दहिवडी ४, म्हसवड २ तर राखीव गटात अनुसूचित जाती-जमाती ४, विमुक्त जाती ३, इतर मागास ४, महिला राखीव ६ असे एकूण ६१ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत.
नागठाणे गटात नाट्यमय घडामोडींनंतर अंगापूरचे बी. एस. कणसे यांची संघातून उमेदवारी निश्चित असताना उमेदवारीचा हट्ट धरून बसलेल्या राजेंद्र घोरपडे यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. तर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनी आपल्या तालुक्याला इतर मागास प्रवर्गातून गणेश तोडकर यांनी उमेदवारी देऊन झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत शिक्षक संघ एकत्र आला आहे; परंतु संघात व समितीत उमेदवारांनी बंडखोरी केल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. (प्रतिनिधी)
दोंदे गटाने दिली महिलेला संधी
शिक्षक बँक निवडणुकीत अखिल भारतीय शिक्षक संघ (दोंद गट) या एकमेव संघटनेने सर्वसाधारण गटातील आरळे मतदारसंघात रजनी चव्हाण या महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे या गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिकेला २५ वर्षांनंतर संधी
शिक्षक बँक निवडणुकीत नगरपालिका शाळांमधील शिक्षक सभासदांना २५ वर्षांपूर्वी उमेदवारी मिळाली होती. आता यावेळेला सातारा नगरपालिकेतील ज्ञानेश्वर बबन कांबळे यांना अनुसूचित जाती-जमाती गटातून शिवाजीराव पाटील गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर नगरपालिकेला उमेदवारीची संधी मिळाली.