शिक्षिकेची आत्महत्या
By Admin | Updated: April 25, 2015 00:01 IST2015-04-24T23:57:54+5:302015-04-25T00:01:43+5:30
लावंगर येथील घटना : विवाहापूर्वीच कृत्य

शिक्षिकेची आत्महत्या
परळी : विवाह अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपला असतानाच तरुण शिक्षिकेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील लावंघर येथे शुक्रवारी पहाटे घडली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अनुराधा संजय पवार (वय २४, रा. लावंघर) असे या युवतीचे नाव आहे. बारावीनंतर डी.एड. करून ती भोंदवडे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होती. मागील महिन्यात तिच्या लग्नाची सुपारी फुटली होती. तिचा नियोजित वर अधिव्याख्याता असल्याची माहिती मिळाली.
विवाह येत्या ७ मे रोजी होणार होता. त्यासाठी गुरुवारीच साताऱ्यात बस्ताही झाला होता. त्यानंतर सायंकाळी बराच वेळ अनुराधाच्या मैत्रिणी तिच्या घरात तिच्यासोबत होत्या. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकांचा मजकूर तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सर्वजण आनंदात होते. तथापि, पहाटेच्या सुमारास अनुराधाने विष प्राशन केले असण्याची शक्यता असून, सकाळी लवकर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने अनुराधाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि, तिला मृत घोषित करण्यात आले. अनुराधा तीन महिन्यांची असताना तिची आई तिला सोडून गेली होती आणि तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून, ते वेगळे राहतात. घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)