कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोधासाठी शिक्षकांची नेमणूक करावी : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:03+5:302021-06-04T04:30:03+5:30
सातारा : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या ...

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोधासाठी शिक्षकांची नेमणूक करावी : जिल्हाधिकारी
सातारा : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी. शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील, त्यांना तत्काळ मुख्यालयात हजर राहण्याबाबत कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ बाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या गावातील शिक्षक आहे, त्याच गावात त्या शिक्षकाला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात यावी. ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांना काय काम करावयाचे याची सविस्तर माहिती द्यावी. शिक्षकांनी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती संबंधितांना द्यावी. या कामासाठी विविध विभागांची मदत घ्या. तसेच संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाने तत्काळ कोरोना चाचणीही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत केल्या.
या बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन उपलब्धतेबाबत व औषधसाठ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.