आॅडिटच्या नावाखाली शिक्षकांची लुबाडणूक
By Admin | Updated: January 21, 2015 23:49 IST2015-01-21T22:09:07+5:302015-01-21T23:49:30+5:30
विविध विषयांवरून गदारोळ : ९० हजार रुपये गोळा केल्याचा विजय पवार यांचा आरोप

आॅडिटच्या नावाखाली शिक्षकांची लुबाडणूक
पाटण : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे आॅडिट सुरू असून, त्याचा खर्च भागविण्यासाठी केंद्र प्रमुखांनी तालुक्यातील ६१८ शाळांकडून प्रत्येकी दीडशे रुपये वसूल केले. ध्वजनिधी म्हणून शिक्षकांकडून प्रत्येकी ७५ रुपये घेतले, असे सुमारे ९० हजार रुपये गोळा केल्याचा आरोप सदस्य विजय पवार यांनी सभागृहात केला.सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत वेगवेगळ्या विषयांवरून जोरदार गदारोळ झाला. शिक्षकांकडून पैसे उकळले. मात्र, त्याच्या पावत्या देखील दिलेल्या नाहीत. तेव्हा चुकीच्या प्रथा पाडू नका, असे विजय पवार व रामभाऊ लाहोटी म्हणाले. याबाबत गटशिक्षणाधिकारी विलास भागवत म्हणाले, ‘केंद्रप्रमुखांना याची विचारणा केली जाईल व चौकशीअंती तथ्य आढळल्यास कारवाई करू. ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाचा केवळ देखावा न करता परिणाम जाणवला पाहिजे, असा उपक्रम राबविला पाहिजे. अन्यथा सकाळी शाळा तपासणी केल्यानंतर त्या शाळेवरील शिक्षक मनधरणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या घरी येण्यापुरता नको, असे राजाभाऊ शेलार म्हणाले. मोरेवस्ती वाझोली शाळेत वीज नाही, असे सभापती म्हणाल्या. तालुक्यातील १२ गावांमध्ये दूषित पाणी झाले आहे. यामध्ये तळमावले, कुंभारगाव, गुढे, काढणे, धावडे, बिबी, धडामवाडी, हेळवाक आदी गावांचा समावेश आहे.
वनक्षेत्रपाल जी. एन. कोल्हे व विजय साळी हे मासिक सभांना गैरहजर राहतात, ते कोणाला जुमानत नसल्याचे उपसभापती म्हणाले. पाटण तालुक्यातील ४०९ पोलिओ केंद्रांवर २२,९०६ बालकांना पोलिओचा डोस दिला असल्याचे वैद्यकीय अधिकारी घाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अधिकार गाजवायचे का ?
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची सुमारे अडीच लाखांची रक्कम पाटणकर गटाच्या सभापती गुरव व देसाई गटाचे सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी विकासकामांसाठी घेतली. यावरून देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील व रामभाऊ लाहोटी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपसभापती डी. आर. पाटील म्हणाले, ‘सभापतींनी सभागृहाला विश्वासात न घेता अधिकार गाजवायचे का? त्यानंतर पाटणकर गटाच्या राजेश पवार यांनी उपसभापती नामधारी आहेत काय ? असे सांगून उपसभापतींचे समर्थन केले.