शिक्षकांमुळे संस्कारक्षम व्यक्ती घडल्या
By Admin | Updated: February 9, 2015 00:47 IST2015-02-08T21:37:44+5:302015-02-09T00:47:59+5:30
पालकमंत्री : जानुगडेवाडी येथे प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा

शिक्षकांमुळे संस्कारक्षम व्यक्ती घडल्या
सणबूर :‘समाजीतील पुढची पिढी संस्कारक्षम घडविण्याचे पवित्र काम शिक्षक करतो. जबाबदारीची जाणीव ठेवून पेशाशी व समाजाशी निष्ठेने राहून सात्विकपणे व प्रामाणिकपणे काम केले तर त्याचे फळ निश्चित मिळते. शिक्षकांमुळे संस्कारक्षम व्यक्ती घडल्या आणि यापुढे घडणार आहेत,’ असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. जानुगडेवाडी, ता. पाटण येथे पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, उपसभापती डी. आर. पाटील, माजी सभापती वनिता कारंडे, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य रघुनाथ माटेकर, शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके, महेंद्र जानुगडे, मोहनराव जाधव, रामचंद्र लावंड, पोपटराव कणसे, विजयराव थोरात, राजेंद्र बागल, विष्णू खताळ, बाळासाहेब पाटील, मच्छिंद्र मुळीक, राजेंद्र घोरपडे, राजेंद्र बोराटे, समीर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री शिवतारे म्हणाले, ‘आयुष्यात प्राथमिक शिक्षणाला महत्त्व आहे. जर प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तरच त्याची चांगली इमारत उभी राहणार आहे.’
यावेळी आमदार शंभूराज देसाई, संभाजीराव थोरात, महेंद्र जानुगडे आदींची भाषणे झाली. अर्जुन पाटील यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भिलारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)