शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील!

By Admin | Updated: March 5, 2016 00:08 IST2016-03-04T22:22:20+5:302016-03-05T00:08:55+5:30

शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा : दहावी हिंदी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

Teachers demand green lanterns! | शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील!

शिक्षकांच्या मागण्यांना हिरवा कंदील!

किडगाव : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महाराष्ट्राच्या मागण्यासोबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून महामंडळाच्या सर्वच मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला. दहावी बोर्ड परीक्षेच्या हिंदी विषय उत्तरपत्रिका तपासणी कामावरील राज्य हिंदी महामंडळाने टाकलेला बहिष्काराचा निर्णय मागे घेतला असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हिंदी महामंडळाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माध्यमिक स्तरावर हिंदी विषयाशी व्यवसाय शिक्षण विकल्पाचे २०१५-१६ चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे, भाषा गटामध्ये समान काम, समान गुण, समान तासिका या तत्त्वानुसार सहा तासिका देणे. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी विषय अनिवार्य करणे, कृतिपत्रिका स्वरूपात बदल, शिक्षक हस्तपुस्तिका, अभ्यास समिती प्रतिनिधीत्व आदी मागण्यांबाबत शासनाकडे महामंडळाने पाठपुरावा केला. तरी शासनाने दखल घेतली नव्हती. आपल्या मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला पुणे बालभारती कार्यालयासमोर राज्यभरातील मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याबरोबर राज्यभरातील ६५० शिक्षकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.
दहावी बोर्ड परीक्षेतील हिंदी विषय उत्तरपत्रिका तपासणीकामावरील बहिष्काराचा निर्णयही घेतला होता; मात्र शासन स्तरावर हालचाली होऊन बोर्डाचे अध्यक्ष, आयुक्त, सचिव पातळीवर तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व हिंदी महामंडळाच्या शिष्टमंडळाची दि. २ मार्च रोजी सकारात्मक चर्चा झाली.
हिंदी विषयांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळात राज्याचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, शिवाजीराव अडसूळ, सचिव रामानंद पुजारी, सहसचिव व्ही. के. शिंदे, कोषाध्यक्ष सुधाकर माने, सदस्य संजय गावडे, पोपट मिंड, अण्णासो वाळके, यशवंत नेवासे, रंगराव बारी, विलास इनामदार, विजय नाईक, विजय धामण्णा, सुनंदा शिवदास आदींचा समावेश होता.
पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी हिंदी महामंडळाच्या लढ्यात सक्रिय पाठिंबा देऊन शासन स्तरावर चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. शासकीय पातळीवर सर्वच अधिकाऱ्यांनी महामंडळास सहकार्य केले. या लढ्यासाठी हिंदी शिक्षकांनी अभेद्य एकसंध दाखवून विद्यार्थी व राष्ट्रभाषेचे हित जपले. (वार्ताहर)

Web Title: Teachers demand green lanterns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.