गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गुरुजींना शिस्तीचे धडे
By Admin | Updated: December 2, 2014 00:47 IST2014-12-01T20:52:56+5:302014-12-02T00:47:28+5:30
मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर केली कारवाई

गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गुरुजींना शिस्तीचे धडे
कुडाळ : प्राथमिक शाळेतच प्राथमिक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जातात. मात्र, सातारा गटशिक्षण अधिकारी धनंजय चोपडेंनाच शाळा भेटीदरम्यान बेशिस्त शिक्षकांवर कारवाई करावी लागली. शाळेच्या वेळेत उशिरा आलेल्या लेटकमर्स शिक्षकांसह, शाळेत अनावश्यक मोबाईलचा वापर करणाऱ्या पंधरा शिक्षकांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई केली. स्वत: धनंजय चोपडे यांनी प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करीत शिस्तीचे धडे दिले.
शिक्षण संचालकांच्या बैठकीत शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाईलचा वापर करू नये, अध्यापनावेळी अनावश्यक मोबाईल वापर टाळावा, अशा सूचना केल्या होत्या. तरीदेखील आजही
ग्रामीण भागात मोबाईल रेंज पोहोचल्यामुळे शिक्षक शाळेच्या वेळेत व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल मीडियाचा मनोरंजन म्हणून वापर करताना दिसत आहेत. खरंतर अशा प्रकारच्या माध्यमांद्वारे चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून होणे अत्यंत गरजेचे आहे.
गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी महामार्गालगत असलेल्या एका शैक्षणिक बीटमधील दहा शाळांना गेल्या आठवड्यात भेटी दिल्या. या भेटी दरम्यान काही शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाईलवर बोलताना आढळले. त्यामुळे दस्तूर खुद्द गटशिक्षण अधिकाऱ्यांनीच संबंधित शिक्षकांचे हे मोबाईल काढून घेऊन पंचायत समितीत आणले. जवळपास त्या दिवसात त्यांनी पंधरा शिक्षकांवर कारवाई केली. तर लेटकमर्स शिक्षकांवरही बेशिस्तीबद्दल कारवाई केली.
चोपडेंच्या अचानक शाळा भेटीचा चांगलाच शिक्षकांनी धसका घेतला असून, प्राथमिक शिक्षकांमध्ये चोपडेंच्या शिस्तीच्या धड्याची चांगलीच चर्चा आहे. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षकांनी शाळेच्या वेळेत अध्यापनात अडचणी येऊ नये, यासाठी अनावश्यक मोबाईल वापर टाळणे गरजेचे आहे. यापुढेही ही मोहीम अशीच चालू ठेवून शिक्षकांकडून तालुक्यात गुणवत्तापूर्ण काम करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
- धनंजय चोपडे
गटशिक्षण अधिकारी, सातारा