पोलिसांची भूमिका पार पाडतायत शिक्षक
By Admin | Updated: March 20, 2016 23:50 IST2016-03-20T22:18:47+5:302016-03-20T23:50:02+5:30
महामार्ग ओलांडण्यासाठी मदत : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियंत्रणाचे काम

पोलिसांची भूमिका पार पाडतायत शिक्षक
भुर्इंज : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे भुर्इंज परिसरात मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना अक्षरश: जीव मुठीत धरुन कसरत करावी लागत असल्याने येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे शिक्षकच स्वत:चा वेळ खर्ची करुन नियमितपणे वाहतूक नियंत्रणाचे काम अव्याहतपणे करत आहेत.
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अगदी महामार्गालगतच व गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेसाठी महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. शाळेच्या वेळेत महामार्गालगत विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शाळेच्या वेळेत महामार्गावर एकही वाहतूक पोलिस आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. किंंबहुना रस्ता वाहतूक सुरक्षा हा विषयच संबंधित पोलिस विभागाच्या डायरीत नाही काय, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आहे. मात्र येथील शिक्षकांनी पोलिसांच्या या असहकाराबाबत ओरड करण्याऐवजी पोलिसांची भूमिका स्वत:च बजावण्यास सुरुवात केली.
विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी दररोज ४ शिक्षक आपला वेळ खर्ची करुन रस्ता वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत. दोन्ही बाजूची वाहने थांबवून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास या शिक्षकांची होत असलेली मदत म्हणजे एक प्रकारची विद्यार्थीसेवाच आहे. प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी ठराविक संख्येने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्यावर शिक्षक थांबलेले असतात. अनेकदा काही वाहनचालक या शिक्षकांना जुमानत नाहीत, मात्र तरीही हे शिक्षक त्याची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी इमान राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत.
त्यासाठी सर्व शिक्षकांनी या सेवेसाठी दिवस वाटून घेतले असून घरी लवकर जाण्याची घाई न करता त्यांच्याकडून सुरु असलेल्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांनी इकडेही पहावे
विद्यार्थ्यांसह सर्वच पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता आला पाहिजे. नागरिक म्हणून रस्ता सुरक्षासेवा हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यादृष्टीने हे काम वाहतूक पोलिसांचे असून ते मात्र भलत्याच कामात दंग असतात. त्यामुळे शिक्षकांचीही सेवा पाहून पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेत महामार्गावर आपले कर्तव्य बजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.