शिक्षक पटपडताळणी बोगस
By Admin | Updated: December 1, 2014 00:21 IST2014-11-30T21:03:57+5:302014-12-01T00:21:57+5:30
शिक्षण विभागावर ताशेरे : शिक्षकांच्या बदलीचे तोंडी आदेश कोणाचे?

शिक्षक पटपडताळणी बोगस
पाटण : मुरुड प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पटपडताळणी बोगस दाखवून अतिरिक्त शिक्षक नेमणे आहे. याप्रकरणी संबंधित विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तालुक्यातील २६ प्राथमिक शिक्षकांची तोंडी आदेशाने झालेली बदली कुणाच्या मेहरबानीने झाली याची चौकशी करावी, या व इतर कारणांमुळे पाटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर सदस्यांनी ताशेरे ओढले.
सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा झाली. सदस्य रामभाऊ लहोटी यांनी शिक्षक पटपडताळणी बोगसचा विषय चव्हाट्यावर आणत मुरूड शाळेत ६० पटामागे दोन शिक्षक तर ६१ पटामागे तीन शिक्षक अशी पटपडताळणी करण्यात आल्याचे निदर्शनास आणले. २६ शिक्षकांच्या बदलीचा विषय उपसभापती डी. आर. पाटील यांनी लावून धरला. आठवीचे वर्ग नवीन काढले; पण त्यासाठी शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत, असा आरोप शोभा कदम यांनी केला. फडतरवाडी येथील चार शाळा खोल्यांचे बांधकाम अपूर्ण असून, तीन लाख रुपये बँक खात्यावरून काढून खर्च दाखविण्यात आल्याचे सदस्य लहोटी म्हणाले. पळासरी शाळेची इमारत पूर्ण करावी, अशी ही मागणी झाली. पाटण तालुक्यातील ११ गावे डेंग्यूबाबत संवेदनशील गावे असून, नऊ रुग्ण आतापर्यंत सापडले. तीस वर्षांवरील सर्वांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली. पंपळोशी शाळेत किडे झालेली तुरडाळ मुलांना शिजवून देण्यात आल्याचा आरोप मिलन सय्यद यांनी केला.
पाटण आगारात बाहेरचे दुकानदार कचरा टाकतात नजीकच्या ओढ्यावर अनधिकृत बांधकामे झाल्याने ओढ्यातील पाणी आगारात येते, अशी तक्रार आगार प्रमुख विजय गायकवाड यांनी केली. पाटण तालुक्यात पगार घेणारे विस्तार अधिकारी दुसऱ्या तालुक्यात काम करतात. त्यांचे पगार देऊ नका, असे रामभाऊ लहोटी म्हणाले. (प्रतिनिधी)
महिला सदस्याच्या डुलक्या
पाटण पंचायत समितीच्या मासिक सभा सुरू असताना एक महिला सदस्या वारंवार डुलक्या काढताना इतर सदस्य पाहत होते. ज्यांना मोठ्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, त्यांनीच जर सभागृहात डुलक्या काढायचे ठरविले तर लोकांच्या प्रश्नांचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता एस. ए. बारटक्के यांनी महिंद गावामध्ये मंजूर झालेली पाणीपुरवठ्याची योजना आराखाड्यातून वगळली त्यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केले असून, गावातील लोकांना पाणी मिळत नाही. बारटक्केंची चौकशी करावी, अशी मागणी उपसभापती डी. आर. पाटील यांनी दिली.
निर्मलग्रामला पुन्हा जोर लावण्याचा निर्णय
सत्यजित पाटणकर सभापती असताना ९९ टक्के तालुका निर्मल झाला. आता फक्त चार गावे निर्मल करणे बाकी आहे. तरीसुद्धा पुन्हा निर्मल झालेली गावे अस्वच्छ बनू लागली असून, त्यासाठी ग्रामस्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा शुभारंभ ६ डिसेंबरला कोयनानगर येथे करणार असल्याचे संगीता गुरव म्हणाल्या.