शिक्षिकेने स्वखर्चातून रंगवला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:35+5:302021-03-24T04:36:35+5:30
लोणंद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी आदर्श घ्यावा असा वर्ग लोणंद येथील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत आहे. या ...

शिक्षिकेने स्वखर्चातून रंगवला वर्ग
लोणंद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी आदर्श घ्यावा असा वर्ग लोणंद येथील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत आहे. या वर्गाच्या वर्गशिक्षिका मृणाल जाधव यांनी स्वखर्चाने सजविलेल्या या वर्गाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी कौतुक केले. मृणाल जाधव व त्यांना साथ देणारे पती धनंजय जाधव यांचा सत्कार केला.
लोणंद येथील जिल्हा परिषद शाळेचा हा मृणाल जाधव यांचा वर्ग अतिशय सुंदर सजविण्यात आला आहे. बाहेरूनही आकर्षक दिसणाऱ्या या वर्गात प्रवेश करताच एखाद्या संग्रहालयात आल्याचा भास होतो. या वर्गात मुलांच्या कलागुणांना वाव देणारी व त्यांच्या ज्ञानात भर घालणारी विविध प्रकारची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. थोर समाजसुधारकांची भित्तीचित्रे, जुन्या रुढी-परंपरा जपणाऱ्या आकर्षक मूर्ती, मानवाच्या उत्पत्तीपासूनची अनेक भित्तीचित्रे, वर्गात शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या जुन्या साधनांच्या प्रतिकृती हुबेहूब साकारल्या आहेत. खेड्यातील घराच्या आतील सुंदर कलाकृती व छोटी संसारउपयोगी भांडी लक्ष वेधून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम दर्शविणारी विविध पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
वर्गात मुलींसाठी छोटे ग्रंथालय, प्रत्येक मुलींचे फोटो व त्याखाली त्यांच्या वाढदिवसांच्या तारखा असणारा फलक, त्यास केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, छानसा डेस्क, वर्गात ई लर्निंगसाठी एलईडी टीव्ही, संगणक, फळ्याच्या चारी बाजूला रंगीबेरंगी लाईटच्या माळा, पंखे, खिडक्यांना आकर्षक पडदे, घड्याळ, संगीत शिकविण्यासाठी पियानो, पेटी, माईक, स्पीकर, विविध शैक्षणिक पोस्टर्स, तसेच वर्गाचे छतही आकर्षक झुरमुळ्यांनी सजविले आहे. फरशीवर मॅट टाकण्यात आले आहे.
वर्गाच्या या सजावटीबरोबरच वर्गातील मुलींना शिकविण्यासही या वर्गाच्या शिक्षिका कमी पडल्या नाहीत. वर्गातील अनेक मुली स्पर्धा परीक्षेत अव्वल ठरल्या आहेत. शालेय अभ्यासक्रमात मुली अव्वल असून संगीत व विविध कलागुणांत मुलींचा प्रथम क्रमांक आहे. स्वतःच्या मुलींप्रमाणे विद्यार्थिनींवर केलेल्या संस्कारामुळे या वर्गातील मुलीच नाही, तर त्यांचे पालकही खूश आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असून मुलींना घेऊन नाटक, पोवाड्याच्या माध्यमातून कोरोना लढ्यासाठी जनजागृती केली आहे.
यावेळी नगराध्यक्ष सचिन शेळके, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, गटविकास अधिकारी बिचुकले, केंद्रप्रमुख बी. डी. धायगुडे उपस्थित होते.
फोटो २३लोणंद-स्कूल
लोणंद येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील शिक्षिका मृणाल जाधव यांचा आमदार मकरंद पाटील यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. (छाया : संतोष खरात)