पोलिस ठाण्यात चहा.. तासात ‘घरवापसी’
By Admin | Updated: April 2, 2016 00:03 IST2016-04-01T22:57:32+5:302016-04-02T00:03:47+5:30
सोनार उरेल कान टोचण्यापुरता : ‘जेल भरो’ आंदोलनावेळी सुवर्णकारांनी ‘लोकमत’जवळ मांडल्या व्यथा

पोलिस ठाण्यात चहा.. तासात ‘घरवापसी’
सातारा : सरकारचे ‘कान टोचण्याचा’ प्रयत्न सुवर्णकार गेले ३२ दिवस करीत आहेत. परंतु सरकारचे धोरण कायम राहिले तर सोनार केवळ कान टोचण्यापुरताच उरेल, अशी भीती सुवर्णकारांनी ‘जेल भरो’ आंदोलनादरम्यान ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या सुवर्णकारांना पोलिसांनी चहा पाजून तासाभरात घरी सोडले.
केंद्राचा अबकारी करविषयक नवा कायदा, हॉलमार्कची सक्ती आदी मुद्द्यांवरून सुवर्णकार, सराफ संघटनेचे आंदोलन सुरू होऊन महिना उलटला आहे. निषेधाचा भाग म्हणून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता साताऱ्यातील सुवर्णकारांनी शनिवार चौकात ‘जेल भरो’ आंदोलन केले. शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. आंदोलकांची नावे लिहून घेण्यात आली. तासाभरात पोलिसांनी व्हॅनमधून आंदोलकांना पुन्हा घरी सोडले.
या निमित्ताने सुवर्णकारांशी पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या चर्चेतून या तीव्र आंदोलनाची कारणे समोर आली. हॉलमार्कच्या नोंदणीसाठी सुवर्णकारांकडे व्हॅट नंबर असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दहा लाखांची उलाढाल सक्तीची आहे. ग्रामीण भागातील सुवर्णकारांना हे शक्य नाही. हॉलमार्कसाठी सोन्याच्या दागिन्यांची ने-आण करावी लागेल आणि सुरक्षेची तजवीज नसल्याने ती धोक्याची ठरेल. याचाच अर्थ दागिन्यांची घडण आणि विक्री मोठ्या कंपन्यांपुरती सीमित राहून केवळ नाक-कान टोचण्याचेच काम सुवर्णकारांकडे राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.
हॉलमार्क सक्तीचे करणारा कायदा संमत झाला आहे; मात्र हॉलमार्कची केंद्रे उभारली गेल्यानंतरच अंमलबजावणी सुरू होईल. अबकारी कराचा कायदा लागू झाल्यास बाहेरून किती दागिने घेतले, स्वत: किती तयार केले आणि बाहेरून तयार करवून किती घेतले, या तिन्हीचा हिशेब सुवर्णकारांना सादर करावा लागणार आहे. लहान व्यापाऱ्यांना तेही शक्य नाही. हॉलमार्कच्या निकषानुसार दागिने घडविताना विशिष्ट पद्धतीने सोने वितळवावे लागते. ती पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असून, प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, दहा-दहा वर्षे शिकलेल्या कलेचे काय, असा सुवर्णकारांनी उपस्थित केला.
सातारा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मोतिलाल जैन, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मामा नागोरी, नंदू बेनकर, राहुल करमाळकर, नितीन घोडके, सुरेश बोरा, नीलेश पंडित आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
पारंंपरिक कला लोप पावणार?
बारीक मण्यांवर हॉलमार्क शक्य नसतो. त्यामुळे बारीक मण्यांचे पारंपरिक दागिने आणि ते बनविण्याची कला लोप पावण्याची भीती सुवर्णकार व्यक्त करतात. असे अलंकार बनविणाऱ्या कारागीरांची संख्या अत्यल्प आहे. ‘गोखरू’ बांगड्या बनविणारे राज्यात मोजके कलाकार असून, साताऱ्यात केवळ एकच कलाकार आहे. ‘जाळीमणी’ बनविणारा एकही कलाकार नसल्याने अतिदुर्मिळ म्हणून अशा मण्यांचा काळाबाजार होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. ठुशी, साज, चिंचपेटी असे अलंकारही कालौघात नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रतीक्षा
पाच तारखेची
सुवर्णकार, सराफ संघटनेचे प्रतिनिधी येत्या पाच तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा कशी होते आणि निर्णय काय होतो, याकडे सुवर्णकारांचे लक्ष लागले आहे. ३२ दिवसांच्या ‘बंद’मुळे लहान सुवर्णकारांना अधिक झळ पोहोचली असून, आपला पारंपरिक व्यवसाय टिकण्याच्या दृष्टीने पाच तारखेला निर्णय व्हावा, अशी आशा ते बाळगून आहेत.
महिनाभरात जिल्ह्यामध्ये तब्बल चाळीस कोटींची उलाढाल ठप्प!
सातारा : लग्नसराईत सर्वच सराफपेड्या हाउसफूल झालेल्या असतात. पाय ठेवण्यासही जागा राहत नाही तशीच सुवर्णकारांना जेवण करायलाही वेळ मिळत नाही. या दिवसांत सातारा शहरात दररोज सरासरी पन्नास लाखांची उलाढाल होत असते. मात्र, सुवर्णकारांचा बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. या महिनाभरात शहरामध्ये सरासरी सोळा कोटींचा तर सातारा जिल्ह्यात चाळीस कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे.
केंद्र सरकारने लादलेला अबकारी कर व त्यांच्या जाचक अटी मान्य नसल्याने सुवर्णकारांनी १ मार्चपासून देशभर बेमुदत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा सराफ असोसिएशननेही सक्रिय सहभाग घेतला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. आंदोलनाचा शुक्रवारी ३२ वा दिवस आहे.
सातारा शहरातील नागरिकांची आर्थिक सुबत्ता वाढते व नागरिकरण यांचा विचार करून पुणे, बारामती येथील मोठ्या सराफ व्यावसायिकांनी साताऱ्यात शाखा उघडल्या आहेत. त्यातच मूळचे सातारकर असलेलेही असंख्य विक्रेते आहेत.
शहरात लहानमोठे सुमारे दोनशे सुवर्णकार आहेत. तर जिल्ह्यात हा अकडा साडेसातशेच्या घरात आहे. त्यामुळे काहींची रोजची उलाढाल काही हजार असेल तर काही नावाजलेल्या दुकानांची उलाढाल लाखाच्या पुढे जाते. त्यामुळे शहरात लग्नसराईत किमान पन्नास लाखांचा व्यवहार होत असतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महिन्यात सोळा कोटींचा व्यवहार ठप्प झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुकाने बंद असल्याने दुकानातील कारागीर, कामगारांना सुटी दिली आहे. बेमुदत बंदचा सर्वाधिक फटका या घटकाला बसला आहे. यांचे पोट रोजच्या कामावर आहे. रोजगारच बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांचे घरभाडे, किराणा माल, धान्य, दूध यांची देणी राहिली आहेत. तर काही कारागिरांनी या काळात गावी पाहुण्यांकडे जाणे पसंत केले आहे. (प्रतिनिधी)