उंडाळेच्या विद्यार्थ्यांची पाससाठी कऱ्हाडवारी

By Admin | Updated: July 17, 2014 23:17 IST2014-07-17T23:13:47+5:302014-07-17T23:17:46+5:30

शैक्षणिक नुकसान : उंडाळेत पास वितरण करण्याची मागणी

Taxpayers to pass students out of school | उंडाळेच्या विद्यार्थ्यांची पाससाठी कऱ्हाडवारी

उंडाळेच्या विद्यार्थ्यांची पाससाठी कऱ्हाडवारी

उंडाळे : कऱ्हाड दक्षिणमध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण झाले आहे. याठिकाणी बालवाडीपासून ते विविध माध्यमांच्या महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची सर्व सोय उपलब्ध आहे. मात्र, विद्यार्थ्यांना एस. टी. चे पास मिळविण्यासाठी दर महिन्याला कऱ्हाडला जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता उंडाळे येथेच पास मिळण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
उंडाळे हे कऱ्हाड दक्षिणमधील मध्यवर्ती ठिकाण आहे. याठिकाणी इंग्रजी, मराठी माध्यमांची शाळा, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचीही याठिकाणी सोय करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये गोटेवाडी, येळगाव, येवती, घराळवाडी या गावांसह सुमारे २३ गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. नांदगावमध्ये कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे याठिकाणीही विभागातील बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओंड येथे कनिष्ठ महाविद्यालय आहे. विभागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय नजीक असल्याने अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. घोगावमध्ये फार्मसी कॉलेज असून, या कॉलेजमध्ये घराळवाडीपासून ते कालेपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
विभागातील या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी खेडेगावातून तसेच वाड्या-वस्त्यांवरून येतात. या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी एस. टी. ची सोयही आहे. मात्र, त्यांना एस. टी. चे सवलत पास येथेच मिळत नसल्याने दर महिन्याला पास काढण्यासाठी कऱ्हाडला जावे लागते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आपला एक दिवस घालवावा लागतो.
त्यामुळे परिवहन महामंडळाने विभागातील विद्यार्थ्यांसाठी उंडाळे येथेच पास वितरित करण्याची सुविधा करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Taxpayers to pass students out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.