मलकापुरातील मिळकतदारांना करवाढीचा झटका तीन झोनसह सहा गटात वर्गीकरण
By Admin | Updated: November 11, 2014 23:18 IST2014-11-11T21:54:05+5:302014-11-11T23:18:39+5:30
नवीन नियमानुसार कर आकरणीचा ठराव

मलकापुरातील मिळकतदारांना करवाढीचा झटका तीन झोनसह सहा गटात वर्गीकरण
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या आज झालेल्या सभेत शासनाच्या नियमानुसार मुल्यवर्धित कर आकारणी लागू करून सतरा ते बावीस टक्के करवाढ करण्याचा महत्वपुर्ण ठराव करण्यात आला. नविन सर्व्हेक्षणानुसार १२ हजार २३० मिळकतींचे ३ झोन पाडले असुन सहा गटातील वर्गीकरणानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायीक व उच्चभ्रु मिळकतदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील बावीस विषयांसह ऐनवेळच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ते विकास व दुरूस्ती अनुदानातून शहरातील विविध रस्त्यांची कामे करणे, चोवीस तास पाणी योजनेच्या एक्स्प्रेस फिडरची दुरूस्ती करणे, नगरोत्थान अभियानांतर्गत विविध कामांना मंजुरी व प्रस्ताव करण्यास मंजुरी देणे, वैशिष्ठ्यपुर्ण योजनेतून मिळालेल्या अनुदानातून करावयाच्या कामांना मंजुरी देणे अशा विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शासनाच्या नियमाप्रमाणे चतुर्थ वार्षिक मुल्यावर आधारीत कर आकारणी लागू करण्यासंबंधी चर्चेस घेण्यात आला. शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यापासुन ग्रामपंचायत कालावधीप्रमाणेच कर आकारणी सुरू होती. शासनाच्या नविन नियमानुसार मुल्यावर आधारीत कर आकारणी लागू करण्याचे बंधन असल्याचे उपनगराध्यक्ष शिंदे यांनी सांगीतले. यावर राजेंद्र यादव यांच्यासह चांदे यांनी नागरीकांना त्रास न होईल, अशी आकारणी करावी अशी सुचना मांडली. कर आकारणीबाबत शहरातील मिळकतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. १२ हजार २३० एकुण मिळकती आहेत. या मिळकतींचे ३ झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. झोन क्र. १ मध्ये कोल्हापूर नाका ते खारवत ओढा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा दोनशे मिटरचा परीसर व ढेबेवाडी फाटा ते रस्त्याच्या दुतर्फा महिला उद्योगपर्यंतचा दीडशे मिटरचा परीसर समाविष्ट करण्यात आला आहे. शहरातील ऊर्वरीत भाग झोन क्र. २ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तर शहराच्या दक्षिणेकडील सर्व मळे झोन क्र. ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमधील मिळकतींचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले असुन प्रत्येक गटाच्या दराप्रमाणे त्या-त्या मिळकतींवर कर आकारणी करण्याचा महत्वपुर्ण ठराव या सभेत करण्यात आला. नविन कर आकारणीनुसार झोन १ मधील उच्चभ्रू व व्यावसायीक मिळकतदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ज्यांना पुर्वी १५० रूपये घरपट्टी होती त्यांना नविन कर आकारणीनुसार सुमारे १८४ रूपये एवढी घरपट्टी येणार आहे. त्यामुळे सरासरी १७ ते २२ टक्के करवाढ शहरात लागू होणार आहे. मिळकतींचे वर्गीकरण कर आकारणीसाठी मिळकतीचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. गट १ मध्ये सर्व प्रकारच्या आरसीसी इमारतींचा समावेश आहे. गट २ मध्ये लोडबेअरींग इमारतीचा समावेश आहे. गट ३ मध्ये दगड, विटा, सिमेंट बांधकाम व वरती पत्रा, कौले असणारी घरे. गट ४ मध्ये दगड, विटा, माती बांधकाम व वरती पत्रा अथवा कौले. गट ५ मध्ये कुडाची, झोपडीची तर गट ६ मध्ये खुल्या प्लॉटचा समावेश आहे. अनेकांना घसाऱ्याचा लाभ नविन कर आकारणीत दरवाढ झाली असली तरी अनेक मिळकतदारांना घसाऱ्याचा लाभ मिळणार आहे. दहा वर्षापुर्वीच्या मिळकतीला १० टक्के, वीस वर्षापुर्वीच्या मिळकतीला २० टक्के तर तीस वर्षापुर्वीच्या मिळकतीला ३० टक्के घसारा मिळणार आहे. घंटागाडीवर प्रभात गिते शहरात कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवर ध्वनीक्षेपक बसवुन त्याद्वारे स्वच्छतेबाबतची जनजागृती करणे व प्रभात गितांद्वारे शहरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा महत्वपुर्ण ठरावही यासभेत घेण्यात आला.