हजारमाचीच्या ग्रामसभेत करवसुली, प्रोसिडिंगवरुन गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:34+5:302021-09-07T04:47:34+5:30
ओगलेवाडी : हजारमाची येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रचंड गोंधळात पार पडली. मासिक सभेला इतिवृत्त लिहिण्यासाठी ग्रामसेवकाकडून होणारी टाळाटाळ, थकीत ...

हजारमाचीच्या ग्रामसभेत करवसुली, प्रोसिडिंगवरुन गदारोळ
ओगलेवाडी : हजारमाची येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रचंड गोंधळात पार पडली. मासिक सभेला इतिवृत्त लिहिण्यासाठी ग्रामसेवकाकडून होणारी टाळाटाळ, थकीत कर वसुली, बोगस नळ कनेक्शन, सरपंच प्रतिनिधी नेमणे, रखडलेली विकासकामे आदी विषयांवरुन जोरदार खडाजंगी झाली. तब्बल दीड वर्षांच्या लॉकडाऊननंतर प्रथमच प्रत्यक्ष पार पडलेली ही ग्रामसभा तब्बल तीन तास चालली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या घबाडे होत्या. यावेळी उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर, तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मैथली मिरज उपस्थित होत्या. सभेच्या सुरूवातीपासूनच विरोधी सदस्य शरद कदम यांनी ग्रामसभेचे निमंत्रण बहुतांश ग्रामस्थांना मिळाले नसल्याची तक्रार केली.
सदस्य शरद कदम, संगीता डुबल, सारिका लिमकर यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार एकाधिकाराने व मनमानीपणे होत असल्याचा आक्षेप घेतला. गटविकास अधिकाऱ्यांनी सभेत इतिवृत्त लिहिण्याचे आदेश दिले असतानाही ते लिहिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. घरपट्टीची पूर्ण वसुली होत नसल्याने ऐंशी लाखांचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे नाईलाजाने पाणीपट्टी वाढविण्याचा विषय उपसरपंच प्रशांत यादव यांनी मांडताच ग्रामस्थांनी त्याला विरोध करुन आधी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी लावून ठरली. विरोधी सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांचे दीर कारभार पाहात असल्याचा आरोप केला. यावरुन जयवंत विरकायदे यांनी सरपंचांना तुम्ही प्रतिनिधीची नेमणूक केली आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना एक महिला सरपंच म्हणून काम करताना मर्यादा येत असल्याने दीर मला मदत करतात, असे सांगितले. यावरुन ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. ग्रामपंचायतीचा सुमारे एक कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अनेक बड्या लोकांनी वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचा कर थकवला आहे. काही लोकांनी इमारती बांधून वर्षानुवर्षे ते वापरत आहेत. मात्र, त्या इमारतींची नोंदही ग्रामपंचायतीकडेे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने अशांकडून प्रथम कर वसूल करावा. २५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीदारांच्या नावाचे फ्लेक्स गावातील चौकात लावावेत, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा सर्जेराव पानवळ यांनी दिला.
डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. गावात सहा प्रभाग आहेत. त्यांना कमी-जास्त प्रमाणात विकासनिधी दिला जातो, त्याचे निकष ठरावेत, अशी मागणी सदस्य पितांबर गुरव, विनोद डुबल, प्रकाश पवार यांनी केली. ग्रामपंचायतीने सतरा सदस्यांना विचारात घेऊन गावचा कारभार करण्याची मागणी नंदकुमार डुबल यांनी केली. पशुवैद्यकीय दवाखान्यात पैसे दिल्याशिवाय जनावरांवर उपचार होत नसल्याचा आरोप सूर्यभान माने यांनी केला.