एसटीचा लांबूनच टाटा

By Admin | Updated: November 28, 2014 23:49 IST2014-11-28T22:30:47+5:302014-11-28T23:49:57+5:30

नियमात पाप : अरुंद रस्ते अवैध पार्किंगमुळे उंब्रजमध्ये अवघड प्रवास

TATA is a long way from Tata | एसटीचा लांबूनच टाटा

एसटीचा लांबूनच टाटा

अजय जाधव - उंब्रज -येथील बसस्थानकात एसटी येण्यासाठी उपमार्ग केलेल्या आहेत. मात्र, या उपमार्गावरच व्यापारी, ग्राहकांची वाहने अवैधपणे लावलेले असतात. नियमात ‘पाप’ करून छोटा केलेल्या उपमार्गावरील अवैध वाहनतळ, प्रवाशांची प्रतीक्षा करत ठाण मांडलेल्या जीप व रिक्षामुळे अनेकदा एसटी बसस्थानकाला ‘टाटा’ करत महामार्गावरून जात आहेत.
एसटी बसस्थानकात येण्यासाठी उपमार्गावर ‘नो-पार्किंग’झोन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांसाठी तयार केलेल्या फूटपाथवरही अतिक्रमणे वाढली आहेत. या उपमार्गावरील ‘नो पार्किंग’, अतिक्रमणे निघाली तर एसटी बसस्थानकात सहज जाऊ शकते. असे झाल्यास उंब्रजकरांच्या समस्येचे निराकरण होऊ शकते.
बसस्थानक बस येण्यासाठी उपमार्ग खुले झाले की येथील स्थानिक वाहतुकीचाही प्रश्न सुटणार आहे. मोठी वाहनेही उपमार्गावरून जातील व वाहतुकीची कोंडी होणार नाही. सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची वर्दळ वाढत आहे. चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना पुणे, मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव उंब्रजमध्ये येत आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.


बसस्थानकात येणार गाड्या
सोमवारपासून अंमलबजावणी : एसटी महामंडळ, पोलिसांची बैठक
उंब्रज : राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सोमवार, दि. १ पासून उंब्रज बसस्थानकात जातील. दरम्यान, एसटीला बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ता खुला करण्यासाठी उपमार्गातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे उंब्रजमधील ग्रामस्थांची चांगली सोय होणार आहे.
महामंडळाच्या उंब्रज बसस्थानक एसटी जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात शुक्रवारी उंब्रज पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील, एसटीचे गजानन पवार, उपसरपंच सुरेश साळुंखे, ग्रामविकास अधिकारी एच. डी. पाटील, सदस्य समीर शिकलगार, संजय पाटील उपस्थित होते.
‘एसटी गाड्या बसस्थानकात नेण्याची जबाबदारी महामंडळाची राहील. त्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक, अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील. याची अंमलबजावणी सोमवार, दि. १ पासून करण्यात येईल,’ अशी ग्वाही एसटी महामंडळाचे गजानन पवार यांनी दिली.
‘उपमार्गाच्या बाजूला अतिक्रमण केलेल्या ५६ व्यापाऱ्यांना व पश्चिम बाजूच्या ८१ व्यापाऱ्यांना पदपथावरील अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्यानुसार काहीनी स्वत:च अतिक्रमण काढले आहेत,’ अशी माहिती ग्रामविस्तार अधिकारी एच. डी. पाटील यांनी दिली.
‘बसस्थानकाकडे जाण्याचा उपमार्ग खुला व्हावा, यासाठी सोमवार, दि. १ पासून कोणतेही वाहन उपमार्गावर उभे करू दिले जाणार नाही. यासाठी उंब्रज पोलिसांनी वाहने उचलण्यासाठी ‘क्रेन’ मागविली आहे. तसेच अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांचा माल येणार आहे. त्यांनी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या मार्गावर मालाची वाहने उभी करावी. दिवसा मात्र खासगी जागेतच वाहने उभी करावीत, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा सज्जड दमही सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी भरला.
प्रवासी वाहतूक करणारे एक वाहन या मार्गावर उभे करू शकतील. इतर वाहने खासगी जागेत उभी राहतील. पाटण, तिकाटणे येथील वाहने दोनशे मीटर अंतरावरील वीजवितरण कंपनीच्या संरक्षण भिंतीशेजारी उभी राहतील. चोरे रोड, अंधारवाडी रोड येथे एका बाजूला पार्किंग करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जी वाहने थांबतात. त्यामुळे असंख्य प्रवासी महामार्गावरच वाहनांची वाट पाहत थांबत असतात. ही परिस्थितीत अशीच कायम राहिली तर खंडाळा अपघाताची पुनर्रावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.
- विजय जाधव


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या पाहून उंब्रजला उड्डाणपूल मंजूर होता. तो झाला असता, तर या समस्याच उद्भवल्या नसत्या.
- पृथ्वीराज पाटील (शिरगावकर)

Web Title: TATA is a long way from Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.